मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर या रेल्वे मार्गासाठी आजवर कुणी काय केले यापेक्षा आता भविष्यात काय होणार आहे यावर सर्वानी लक्ष केंद्रीत करायला हवे. हा रेल्वे मार्ग होणारच यात शंका नाही, असे स्पष्ट करत खा. डॉ. सुभाष भामरे यांनी सर्वाच्या जिव्हाळयाचा विषय असलेला हा रेल्वे मार्ग ‘स्पेशल परपज व्हेईकल’ अंतर्गत उभारला जाईल. तसेच रेल्वेच्या विकासासाठी परदेशी गुंतवणुक आणि सार्वजनिक-खासगी भागिदारी या माध्यमातून निधी जमविण्याचे प्रयत्न आहेत. देशभरातील प्रलंबित सर्वच रेल्वे मार्ग यात अंतर्भूत असल्याने केवळ मनमाड-इंदूर मार्गच कें द्र सरकारच्या डोळ्यासमोर नसल्याची जाणिव करुन देण्यास ते विसरले नाहीत. रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर जिल्ह्णाातील भाजप खासदार व आमदारामध्ये नाटय़मय अंक रंगला आहे.
आमदार अनिल गोटे यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात आपली भूमिका मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगबगीने खासदार डॉ.भामरे हेही आपणही या मागणी संदर्भात कसे संवेदनशील आहोत याची माहीती देण्यासाठी पत्रकार परिषदेतून पुढे आले. केवळ उपरोक्त रेल्वे मार्गच नाही तर आहे त्या धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गाचाही कसा कायापालट करणार आहोत याचीही माहीती त्यांनी यावेळी दिली. खा. भामरे पुढे म्हणाले, या रेल्वे मार्गाबाबत भूतकाळात काय झाले, यापेक्षा वर्तमानात काय सुरू आहे आणि भविष्यात काय होणार आहे यालाच आपण सर्वानी महत्व द्यायला हवे. रेल्वेमंत्रीपद सुरेश प्रभू यांना या रेल्वे मार्गाचे महत्व माहीत आहे. रेल्वे विभागाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. रेल्वेच्या एक रूपये ऊत्पन्नात तब्बल ९४  पैसे खर्च व्यवस्थापनावर होत आहे. हा खर्च पाहाता नवे रेल्वे मार्ग होणे सोपे काम नाही. पूर्वीच्या सरकारने ९९ रेल्वे प्रकल्प मंजूर केले असताना केवळ एकच रेल्वे मार्ग पूर्ण करता आला. अपूर्ण असलेले देशातील ९८ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ५० हजार कोटी रूपयांची गरज आहे. हा निधी उपलब्ध करण्यासाठी रेल्वे विभागाला पर्याय शोधावा लागणार आहे. कारण गेल्या दहा वर्षांत रेल्वेने दरवाढ केलेली नाही. केंद्र सरकार आणि घटक राज्यांमध्ये एक करार होणार असून यासाठी रेल्वे आणि घटक राज्य यांच्यात भाडभांडवल ऊभारले जाणार आहे. या ‘स्पेशल परपज व्हेईकल मॉडेल’ला बहूसंख्य राज्यांनी अनुकुलता दर्शविली असल्याचे खा. डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, खा.भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. सद्यस्थितीतील चाळीसगाव-धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गावर सुविधा वाढवाव्यात, धुळे रेल्वे स्थानकावर २४ कोचसाठी प्लॅटफार्म तयार करावा, रेल्वे स्थानकाला आदर्श रेल्वे स्थानकाचा दर्जा द्यावा, अमृसर एक्सप्रेस या गाडीचा थांबा कुर्ला नव्हे तर दादर स्टेशन करावा, धुळयाहून पुणे आणि सुरतसाठी दोन स्वतंत्र गाडय़ा सूरू कराव्यात, धुळे-चाळीसगांव या पॅसेंजर रेल्वेच्या फे ऱ्यांची
संख्या दुप्पट करावी आदींचा त्यात समावेश आहे.