हिंदुस्थानचा खरा इतिहास कळण्यासाठी भारतातील सर्व राज्यांत मराठय़ांचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खंडाळा येथे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या आगामी प्रतापगड ते रायरेश्वर गडकोट मोहिमेबद्दल मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो तरुण उपस्थित होते.

भिडे गुरुजी म्हणाले, की छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. त्यांच्या इतिहासातून राष्ट्रभक्तीचेच धडे मिळतात. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा तर छत्रपती संभाजीराजांनी कसे मरावे याचा मंत्र दिला. आज राष्ट्रउभारणी आणि त्याच्या रक्षणासाठी देशात सर्वत्र हा इतिहास शिकवण्याची गरज आहे. हिंदुस्थानचा हा जाज्वल्य इतिहास सगळय़ांना समजण्यासाठी देशात सर्वत्र इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात ‘मराठय़ांचा इतिहास’ समाविष्ट करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण तशी मागणी करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आमच्या इतिहासात दडलेले राष्ट्रभक्तीचे धडे आजच्या तरुणाईला मिळाले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले, की या इतिहासातून सक्षम भावी पिढी तयार होईल. ही अशी पिढी तयार व्हावी यासाठीच गडकोट मोहिमांचे आयोजन केले जाते. यंदा प्रतापगड ते रायरेश्वर या गडकोट मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेअंतर्गत ३० रोजी रायरेश्वर येथे पुन्हा एकदा स्वराज्य उभारणीची शपथ घेतली जाणार आहे. तरी महाराष्ट्रातील धारकरी आणि शिवभक्तांनी यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

यावेळी खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामस्थांच्यावतीने रायगडावरील सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी एक लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली गेली. तालुका कार्यवाहक म्हणून गौरव पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha history should be taught everywhere in country says bhide guruji
First published on: 20-01-2018 at 03:32 IST