यवतमाळ जिल्ह्य़ाच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रचंड मोठय़ा संख्येने निघालेला मोर्चा म्हणून ऐतिहासिक नोंद करणारा मराठा क्रांती मूकमोर्चा रविवारी भरपावसातही विचलित न होता जल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील तरुण-तरुणी, महिला आबालवृद्ध सहभागी झाले होते.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मूकमोर्चात मराठ आणि कुणबी समाजाच्या एकीचे बळ दिसले. कोणताही राजकीय चेहरा नसलेल्या या मोर्चासाठी खेडय़ापाडय़ातून महिला मुलाबाळांसह सहभागी झाल्या होत्या. एकूणच समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी यवतमाळकरांनी अनुभवला.
या मोर्चाने आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. येथील पोस्टल मैदानातून दुपारी १२ वाजता मोर्चा निघेल, अशी घोषणा आयोजकांनी केलेली असल्यामुळे सकाळपासूनच जिल्हाभरातून नागरिकांचे लोढेंच्या लोंढे यवतमाळात दाखल होत होते. पोलिसांनी वाहतूक वळविल्याने अनेक मोर्चेकरी आपली वाहने तेथेच ठेवून पायी मोर्चास्थळी पोहोचले. सर्व प्रमुख मार्गांवर दुचाकी वाहनेही चालविण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा सहभाग मोठय़ा संख्येने दिसून आला.
या मोर्चामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांसह सर्व प्रतिष्ठाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद होती. तीन ते चार हजार स्वयंसेवक काळा टी शर्ट व काळी पॅन्ट या वेषात मोर्चाच्या व्यवस्थेत होते. रस्त्यावरील कचरा उचलण्यापासून पिण्याचे पाणी वाटप करण्याचे काम स्वयंसेवक करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण व जिजाऊ वंदना करून पोस्टल मैदानातून दुपारी १२ वाजता भरपावसातच मोर्चाला सुरुवात झाली. यात युवती व महिलांची लक्षणीय संख्या होती.
पोस्टल ग्राऊंड, पूनम चौक, हनुमान आखाडा, गांधी चौक, नेहरू चौक, तहसील चौक, हुतात्मा चौक या प्रमुख मार्गाने दुपारी १ वाजता एलआयसी चौकात पोहोचला. सोनाली वाटाफळे, वैदेही देशमुख, मयुरी कदम, मनीषा काटे, सृष्टी दिवटे व श्वेता दिवटे या पाच तरुणींमार्फत विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना देण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला.