प्रदीप नणंदकर

आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत करण्याची जिद्द भारतीयांमध्ये असून चीनकडून विविध अ‍ॅपद्वारे डेटाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चिनी अ‍ॅपवर बंदी टाकून भारतीय संशोधकांनी आत्मनिर्भर बनून स्वत:चे अ‍ॅप विकसित करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले. देशभरातून विविध गटांतील सात हजार जणांनी केंद्र सरकारने घेतलेल्या स्पर्धेत सहभाग दिला.

समाजमाध्यम गटातून ‘चिंगारी अ‍ॅप’ला २० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. या अ‍ॅपचे सहनिर्माते दीपक साळवी हे मूळचे मुंबईचे असून या  यशाबद्दल त्यांना मराठी माणूस म्हणून सार्थ अभिमान वाटतो.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी समाजमाध्यम गटात लोकप्रिय व पहिल्या क्रमांकाची पसंती मिळविणारे चिंगारी अ‍ॅप असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या उपक्रमातून या अ‍ॅपचे कौतुक केले.

दीपक साळवी यांनी एमबीए मार्केटिंगचे शिक्षण घेतल्यानंतर विविध टीव्ही चॅनेलच्या देश व आंतरराष्ट्रीय विभागात ‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणून गेली २० वर्षे ते कार्यरत होते. सुमीत घोष हा बंगळुरूचा सॉफ्टवेअर इंजिनियर मुंबईत नोकरीला होता. तो जवळचा मित्र असल्याने गेल्या आठ-दहा वर्षांपासून आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, अशी त्यांची चर्चा होत असे. बिश्वात्मा नायक हा दुसरा सॉफ्टवेअर इंजिनियर मित्र त्यांच्या सोबत आला व २०१८ साली तिघांनी मिळून समाजमाध्यमात वापरता येईल (टिकटॉकप्रमाणे) असे अ‍ॅप तयार करून ते नोंदणीकृत केले. अ‍ॅप तयार करताना पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान वापरत कॅमेरा, फिल्टर हेही भारतीय बनावटीचे वापरले. लोकांची सव्‍‌र्हरमध्ये साठवलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील याची काळजी घेतली.

या अ‍ॅपमध्ये व्हीडीओ, गाणे, नाच, खेळ, खरेदी, बातम्या, थोडक्यात एका कुटुंबाला लागणारे सर्वकाही उपलब्ध केले. भारत, चीन संबंधातील दुराव्यानंतर आत्मनिर्भर योजनेत संधी मिळाली व पूर्वतयारी असल्याने कामाने गती घेतली. मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती आदी ११ भाषांत हे वापरता येते. याला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. केवळ ९० दिवसांत तीन कोटी १० लाख जणांनी या अ‍ॅपचा वापर केला असून दर दिवशी ५० लाखांपेक्षा अधिक व्हीडीओ अपलोड होतात. अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद पाहून गुंतवणूकदारांच्या जगातील बलाढय़ अशा ‘व्हिलेज ग्लोबल’ कंपनीने स्वत:हून गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली व ती प्रत्यक्षात आणली.

तीन वर्षांत चार हजार कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य

दुबई, पूर्व, मध्य आशियाई देशात तेथील भाषेत अ‍ॅप सुरू केले जाणार असून जगात भारतीय अ‍ॅप वापरले जावे या दृष्टीने नियोजन केले जात आहे. आगामी तीन वर्षांत चार हजार कोटींची उलाढाल व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्राशी स्पर्धा करण्याची आपली कल्पना असून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे दीपक साळवी यांनी सांगितले. एक मराठी माणूस म्हणून आपल्याला या उपक्रमाचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.