चौकाचौकात स्वागत कमानी.. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात उभारलेला नाटय़संमेलनाच्या मुख्य शामियाना.. विद्युत रोषणाईने सजलेली बारामती नगरी.. १२.१२.१२ चा मुहूर्त प्रत्यक्षात दहा दिवसांनी अवतरत असला तरी तोच उत्साह कायम आहे, सारी जय्यत तयारी झाली असून, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन शनिवारी (२२ डिसेंबर रोजी) नाटय़संमेलनाचा पडदा उघडणार
आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवस आणि १२.१२.१२ ही तारीख असा दुहेरी योग साधून ९३ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन बारामती येथे होत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे नव्याने स्वीकारलेले अजित पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
नाटय़परिषदेच्या निवडणुकांची नांदी झाली असून त्यापूर्वीचे हे संमेलन दिमाखात व्हावे यासाठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले आणि त्यांची कार्यकारिणी प्रयत्नशील आहे. तर बारामतीमध्ये रंगकर्मी आणि प्रत्येक नाटय़रसिकाचे उत्साहात स्वागत व्हावे हा संमेलनाचे संयोजक किरण गुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न नाटय़रसिक बाळगून आहेत. रंगभूमीवरचे तारे पाहण्यासाठी नागरिकांनी सायंकाळपासूनच संमेलन स्थळावर गर्दी केली होती.
संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांचे सायंकाळी स्वागताध्यक्ष अजित पवार, किरण गुजर आणि हेमंत टकले यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकाचा प्रयोग शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये रंगला.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान आणि शारदानगर विद्यालय येथील विद्यार्थी शनिवारी सकाळी भिगवण चौक, इंदापूर चौक, गुनवडी चौक आणि कारभारी चौक अशा चार ठिकाणी पथनाटय़ सादर करीत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सांस्कृतिकमंत्री संजय देवताळे यांची संमेलनाच्या उद्घाटन सत्रात भाषणे होणार आहेत. मात्र सर्वाना उत्सुकता आहे ती संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या होणाऱ्या उत्स्फूर्त अध्यक्षीय भाषणाची. रंगभूमी संदर्भात ते कोणता विचार मांडणार याकडेच नाटय़प्रेमींचे लक्ष लागले आहे. मावळते अध्यक्ष श्रीकांत मोघे यांचे भाषण श्रोत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरेल.    

भोजनाची चोख व्यवस्था
माणसाला जिंकण्याचा मार्ग त्याच्या ‘पोटा’तून जातो, याची जाण असल्यामुळे नाटय़संमेलनामध्ये रसिकांसाठी भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एका भोजनामध्ये असलेला खाद्यपदार्थ ‘रीपीट’ होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. श्रीखंड, जिलेबी, मूग शिरा असे तीन स्वीट डीशचे मेनू आहेत. शनिवार रात्री बिर्याणी, मटन फ्राय, तांबडा आणि पांढरा रस्सा असा मांसाहारी भोजनाचा बेतही आखण्यात आला आहे. तर रविवारी (२३ डिसेंबर) संमेलनाचे सूप वाजल्यानंतर पिठलं भाकरी, ठेचा, आळूवडी, वालाची आमटी आणि शेवयाची खीर असे भोजन देण्यात येणार आहे. संमेलनाचे दोन्ही दिवस तीनशे ‘व्हीआयपी’सह एक हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे किरण गुजर यांनी सांगितले. हरेष गुजराथी हे भोजन समितीचे प्रमुख आहेत.