पुलवामा घटनेत शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुळ औरंगाबाद येथील आणि सध्या बेंगळुरू येथे वास्तव्यास असणारा उमेश जाधव हा तरुण प्रत्येक शहिदाच्या घराजवळील माती गोळा करून पुलवामा स्मारक उभारणार आहे. या तरुणाच्या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

”पुलवामा येथे सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांसाठी आपण काही तरी करण्याची गरज आहे असा विचार मनात आला. त्या दृष्टीने घरातील सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर देशभरातील अनेक भागातील शहीद जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधावा आणि तेथील माती गोळा करावी व पुलवामा येथे स्मारक उभारावे असा विचार आला. यासाठी प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. त्यावर या मोहिमेसाठी प्रशासनामार्फतही परवानगी देण्यात आली. त्यानंतर कर्नाटक येथून 9 एप्रिल रोजी शहिदांच्या घरी जाण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. आजअखेर 8 हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे. आजवरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या भागात सैन्य दलाने उभारलेल्या स्मारकाच्या ठिकाणी देखील भेट दिली आहे. आता पुढील 35 हजार किलोमीटरचा प्रवास बाकी असून हा संपूर्ण प्रवास 10 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा तेथील प्रशासनाशी चर्चा करून पुलवामा येथे कोणत्या भागात स्मारक उभारायचे हे ठरविले जाईल”. असे याबाबत बोलताना उमेश जाधवने सांगितलं.

”यासाठी कुटुंबीयांपासून वर्षभर दूर राहावे लागणार आहे, पण या संपूर्ण काळात घरातील मंडळाचे विशेष सहकार्य लाभल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले की, बेंगळुरू येथे माझे म्युझिक स्कूल आहे. पण ते सर्व सोडून ही मोहीम हाती घेतल्यामुळे, हा काय वेडा पणा आहे असे अनेक जण मला म्हटले . पण जे जवान आपल्यासाठी वर्षानुवर्षे सीमेवर रक्षण करत असतात, तर त्यांच्यासाठी मी छोटासा प्रयत्न करतोय असं उत्तर मी त्यांना देतो असं उमेश जाधव म्हणाले.

पाहा व्हिडिओ