लोकनेता हरपल्याचे दुख आजही लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गेले दोन दिवस व्यापाऱ्यांनी स्वतहून व्यवहार बंद ठेवून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापूर्वी दोन दिवस फेसबुकवरील प्रतिमांच्या विटंबनेप्रकरणी जिल्हय़ात ‘बंद’ पुकारण्यात आला होता. त्यामुळे प्रथमच सलग ४ दिवस जिल्हय़ाची बाजारपेठ बंद होती. गुरुवारी पाचव्या दिवशी बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.
फेसबुकवरील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांच्या विटंबनेचे पडसाद जिल्हय़ात सर्वत्र उमटले. १ जून रोजी या प्रकरणी शहरासह जिल्हय़ातील बाजारपेठेत तणाव निर्माण झाल्याने बाजारपेठा बंद झाल्या होत्या. शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला. पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सोमवारी (२ जून) शिवसेनेने ‘जिल्हा बंद’चे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले. या ‘बंद’ दरम्यान जिल्हय़ात अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. दुपारनंतर शिवसेनेने ‘बंद’ मागे घेतल्याचे जाहीर केले, तरीही बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.
मंगळवारचा सूर्योदय बीडवासीयांसाठी अप्रिय वृत्त घेऊनच झाला. सकाळीच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताचे व काही वेळाने त्यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले. जिल्हय़ाचाच नव्हे, तर मराठवाडय़ाचा लोकनेता हरपल्याचे दुख प्रत्येकाला झाले. त्या दिवशी व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. रस्त्या-रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी मुंडे यांच्यावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवशीही जिल्हय़ात कडकडीत ‘बंद’ पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हय़ात प्रथमच सलग ४ दिवस बंद होता. गुरुवारी मात्र बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. तब्बल चार दिवसांच्या ‘बंद’नंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.