शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात रविवारी झालेला सुरुंग स्फोट कसनसूर दलममधील शीघ्र कृती पथकाच्या तीन नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांना आज पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. रविवारी नक्षलवाद्यांनी चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावाजवळ घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० च्या पथकाचे ७ जवान शहीद झाले. शोधमोहीम संपवून परत जाणाऱ्या या जवानांचे वाहन नक्षलवाद्यांनी स्फोटात उडवून लावले. तब्बल ४ वर्षांच्या अंतराने नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत स्फोट घडवून आणल्याने पुन्हा एकदा हा जिल्हा रडारवर आला आहे. ही घटना घडली तो परिसर जंगलाचा नाही. तिथून पुढे जंगल सुरू होते. शोधमोहिमा राबवणारे जवान नेहमी या परिसरात दाखल होताना वाहनांचा वापर करतात व मोहीम संपल्यानंतर पुन्हा वाहनांत बसून परत जातात ही बाब नक्षलवाद्यांनी हेरली होती. त्यानंतर हा सापळा रचण्यात आला. त्याची जबाबदारी एटापल्ली तालुक्यात सक्रिय असलेल्या कसनसूर दलमवर सोपविण्यात आली. या दलमचा कमांडर महेशने हे काम शीघ्र कृती पथकातील तिघांवर सोपवले.
घटनास्थळाच्या आजूबाजूला जंगल नसल्याने मोठय़ा संख्येत सदस्यांची जमवाजमव करून फायदा नाही हे लक्षात आल्यानंतर हे काम केवळ तिघांवर सोपवण्यात आले. घटनास्थळी एक पूल आहे. या पुलापासून सुरू होणारा डांबरी रस्ता ५ फुटाच्या अंतराने सुरू होतो. याच ५ फुटाच्या कच्च्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आधीच सुरुंग पेरला होता. त्यामुळे केवळ स्फोट घडवून आणण्याचे काम या तिघांनी पार पाडले. कसनसूर दलमचे उर्वरित सदस्य घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात दबा धरून असावेत असा संशय विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी  आज लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.
शोधमोहिमा राबवणाऱ्या सी-६० च्या पथकांना आता नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर सुद्धा मानक कार्यपद्धतीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामुळे नक्षलवाद्यांविरूद्ध लढणाऱ्या जवानांच्या मनोधर्यावर कोणताही परिणाम होणार नसून ही लढाई आता आणखी नेटाने लढू असे ते म्हणाले.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या हल्ल्याचा साईबाबाच्या अटकेशी कोणताही संबंध नाही, असे एक्सप्रेस वृत्तसेवेशी बोलताना म्हटले आहे. दक्षिण गडचिरोलीत सक्रिय असलेला व प्रवक्तापदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीनिवासने ही माहिती दिली आहे. कालच्या हल्ल्यामुळे यावर्षांत गडचिरोली जिल्हय़ात शहीद झालेल्या जवानांची संख्या ९ वर गेली आहे.
कालच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७ जवानांचे पार्थिव आज सकाळी गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आणण्यात आले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, पोलीस अधीक्षक सुवेझ हक व इतर अधिकारी हजर होते. त्यांच्या उपस्थितीत या सर्वाना मानवंदना देण्यात आली.

नक्षलवादाच्या मुद्यावर नेहमी मौन बाळगणाऱ्या गडचिरोलीतील राजकीय नेत्यांनी आजच्या मानवंदना कोर्यक्र माक डे चक्क पाठ फि रवली. पोलीस मैदानावर झालेल्या या कोर्यक्र माला एकोही पक्षाचा नेता वा स्थानिक लोक प्रतिनिधी हजर नव्हता. राज्याचे गृहमंत्री व गडचिरोलीचे पालक मंत्री आर. आर. पाटीलसुद्धा आज आले नाहीत.