राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भात मारलेल्या आक्रमक मुसंडीने भाजप आणि शिवसेनेतील अस्वस्थता वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीने विदर्भात संघटन बळकटीकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांच्या अलीकडच्या काळातील सलग विदर्भ दौऱ्यांनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला भिडण्याचा आदेश मिळाला असून शेगाव आणि अकोल्यात झालेले राष्ट्रवादीचे विभागीय मेळावे पक्षाचे शक्तिप्रदर्शन करणारे ठरले.
मेळाव्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पुढील रणनीती स्पष्ट केली आहे. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत कमी असल्याने पक्षबांधणीवर आता भर दिला जात आहे. अन्य पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत खेचण्यासाठी पदे आणि तिकिटांचे प्रलोभन दाखविले जात आहे. भाजपच्या तब्बल १५ वर्षे आमदार राहिलेल्या रेखा खेडेकर यांना राष्ट्रवादीत खेचण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. मेळाव्याच्या निमित्ताने खेडेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचा या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारासाठी शोध सुरू होता. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या आश्वासनावरच रेखा खेडेकर यांनी पक्षांतर केले आहे. रेखा खेडेकरांना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी ओढवून घेतल्यानंतर रेखा खेडेकरांची पक्षात प्रचंड घुसमट सुरू होती. त्यांच्या पक्षांतरामुळे बुलढाणा जिल्ह्य़ात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे.
रेखा खेडेकरांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या गटातही अस्वस्थतेचे वातावरण आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली होती. त्या वेळी शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांविरुद्ध राजेंद्र शिंगणे यांना लढविण्यात आले होते; परंतु अवघ्या २६ हजार मतांच्या फरकाने शिंगणे पराभूत झाले होते. पराभवाचा वचपा काढून लोकसभेत प्रवेशण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनी गेल्या वर्षभरापासून तयारी चालविलेली आहे. पुढील वर्षी लोकसभेची उमेदवारी पक्की असल्याच्या त्यांच्या समजुतीला खेडेकरांच्या प्रवेशामुळे धक्का बसला आहे.
शेगाव आणि अकोल्यातील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या झाडून साऱ्या नेत्यांनी मेळाव्यात हजेरी लावल्याने राष्ट्रवादीने आता अमरावती विभागावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांपैकी किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला याव्यात यासाठी आता मोर्चेबांधणी केली जात आहे. अमरावती, बुलढाणा, गोंदिया आणि वाशीम-यवतमाळ या चार लोकसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी दावा करणार आहे. विदर्भात राष्ट्रवादीला प्रफुल्ल पटेलांच्या रूपाने फक्त भंडारा-गोंदियात विजय मिळाला होता. त्यामुळे लोकसभेच्या चार जागा लढवून महाराष्ट्रातील खासदारांचे संख्याबळ वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादीची पावले पडू लागली आहेत.