कांग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी २४ जानेवारीस पंचायत राज प्रतिनिधींचा उजळणी वर्ग घेणार आहेत. मात्र, त्यांच्या विश्वासू खासदार मीनाक्षी नटराजन यांनी दोन महिन्यांपूर्वीच सेवाग्रामात अत्यंत गोपनीय पध्दतीने अशा प्रकारचा वर्ग घेतल्याची बाब उघडकीस आली आहे.
अखिल भारतीय कांॅग्रेस समितीवर असणाऱ्या मान्यवरांच्या मांदियाळीत खासदार नटराजन यांना गांधींच्याच शिफोरशीने राष्ट्रीय सचिवपदी नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडे ‘राजीव गांधी पंचायत राज संघटन’ या संस्थेची जबाबदारी आहे. देशभरातील दहा लाखांवर पंचायत पुढाऱ्यांना या संघटनेने जोडले आहे.  खासदार राहुल गांधी पंचायत राज संघटनेच्याच देशभरातील अडीचशे समन्वयकांना संबोधणार आहेत. मात्र, समन्वयकांचा पूर्व उजळणी वर्ग खासदार नटराजन यांनी पूर्वीच आटोपला. त्या १२ ते १८ डिसेंबर दरम्यान सेवाग्रामला मुक्कामाला होत्या. याचा एकाही स्थानिक किंवा विदर्भातील पुढाऱ्यास थांगपत्ता नव्हता. या सहा दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी समन्वयकांना मार्गदर्शन करतांनाच सेवाग्राम आश्रम परिसराची स्वच्छता व आश्रमाचा संदर्भ देत स्वातंत्र्य लढय़ाची माहिती शिबिरार्थी नेत्यांना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे १५ डिसेंबरला सिंधूताई सपकाळ यांचा सत्कार आटोपून सेवाग्राम आश्रमाच्या भेटीवर आले होते. ते आश्रमाच्या प्रवेशद्वारावर असतांनाच खासदार नटराजन या आपल्या सहकाऱ्यांसह झाडूने त्या ठिकाणी साफ सफोई करीत होत्या. पक्ष वेगळा असला तरी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिवालाही पवार ओळखू शकले नव्हते. खासदार नटराजन यांची साधी राहणी, तसेच साधारण व्यक्तिमत्व त्यांना असे अपरिचित ठेवणारे ठरल्याचे एका युवक कॉंग्रेसच्या नेत्याने स्पष्ट केले.