18 November 2017

News Flash

मेळघाटातील विद्यार्थ्यांची सत्तर किलोमीटर पायपीट..

वसतिगृहांमधील गैरव्यवस्था चव्हाटय़ावर आणण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी, अमरावती | Updated: September 14, 2017 1:20 AM

चिखलदरा येथून सत्तर किलोमीटर पायपीट करून धारणी येथे पोहचलेले विद्यार्थी.

इमारत जीर्ण, पिण्यायोग्य पाणीही नाही; वसतिगृहांमधील गैरव्यवस्था चव्हाटय़ावर आणण्याचा प्रयत्न

वसतिगृहाची जीर्ण झालेली इमारत, गळणारे छत, स्वच्छतागृह, पिण्यायोग्य पाणी नाही, सोलर वॉटर हिटर बंद आहे. ग्रंथालयातून पुस्तके मिळत नाहीत, चांगले जेवण मिळत नाही, अशा अनेक व्यथा मांडण्यासाठी चिखलदरा येथील आदिवासी वसतिगृहातील मुलांनी धारणीपर्यंत ७० किलोमीटर पायपीट करून आपल्या संतापाला वेगळ्या पद्धतीने वाट मोकळी करून दिली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने वसतिगृहांमधील गैरव्यवस्था चव्हाटय़ावर आली आहे.

चिखलदरा येथे आदिवासी मुलांचे सरकारी वसतिगृह आहे. या ठिकाणी इयत्ता नववी ते पदवी अभ्यासक्रमापर्यंतचे सुमारे ७० विद्यार्थी निवासाला आहेत. वसतिगृहांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी या वसतिगृहात किमान मूलभूत सोयी देखील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून निदर्शनास आले. आपल्या समस्या मांडण्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. चिखलदरा ते धारणी सेमाडोहमार्गे अंतर ७० किलोमीटर आहे. हे विद्यार्थी मंगळवारी दुपारी चिखलदरा येथून निघाले. या प्रकाराची माहिती कळताच प्रकल्प अधिकारी विजय राठोड हे धारणी येथून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी निघाले. हरीसाल नजीक या विद्यार्थ्यांना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण रस्त्यावर चर्चा करण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. आम्ही प्रकल्प कार्यालयात पोहोचून आपल्या समस्या मांडणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. इतर अधिकाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. दोन दिवस पायी चालून हे विद्यार्थी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचले व प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

येत्या पंधरा दिवसांत जेवणाची चांगली सोय, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी या विद्यार्थ्यांना दिले. वसतिगृहाच्या इमारतीचा प्रश्न येत्या तीन महिन्यांमध्ये निकाली काढण्यात येणार आहे. तोपर्यंत चिखलदरा येथील टाऊन हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करता येईल, असे प्रकल्प अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. कार्यालयात प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली, पण या विद्यार्थ्यांनी भोजन करण्यास नकार दिला. गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे धारणीपर्यंत पायी चालत यावे लागले, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या विद्यार्थ्यांनी चक्क पायी वारी करून वसतिगृहांमधील अव्यवस्था लोकांसमोर आणली.

वसतिगृहातील दुरवस्था

वसतिगृहाच्या इमारतीला तडे गेले आहेत. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळले होते. पिण्यायोग्य पाणीही मिळत नाही. वसतिगृहात शौचालय नाही. स्नानगृहाची अवस्था वाईट आहे. सोलर वॉटर हिटर बंद पडलेले आहेत. ग्रंथालयातून तात्पुरते वाचण्यासाठी पुस्तकेही मिळत नाहीत. संगणकांची कमतरता आहे. जेवणासाठी टिफीन मिळत नाही. चांगले भोजन नाही. खुच्र्या नाहीत. वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून आम्ही हा त्रास सहन करीत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

First Published on September 14, 2017 1:20 am

Web Title: melghat students in a bad condition