एका ज्ञातिसंस्थेच्या मुखपत्राच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात अन्य ज्ञातीतील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव होण्याचा अनोखा योग जुळून आल्याचे सुखद दृश्य रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाहायला मिळाले. ‘हेटकरी’ या भंडारी समाजाच्या मुखपत्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले वस्त्रहरणचे लेखक आणि मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या विनोदाची पखरण असलेल्या भाषणाचा आनंदही उपस्थितांना लुटता आला. ‘हेटकरी’ या शब्दातील हेटचा इंग्रजी अर्थ घेण्याचे कारण नसून, सर्वाचे हित साधणारा तो ‘हेटकरी’ हा अर्थ ध्यानात घेतला पाहिजे, असे गवाणकर म्हणाले. वस्त्रहरण या गाजलेल्या मालवणी नाटकाच्या लंडनवारीची हकीकत खुमासदार शैलीत सांगून त्यांनी समारंभाला रंगत आणली.

या समारंभाला ‘हेटकरी’ची अमृतमहोत्सवी स्मरणिका आणि मे २०१६ च्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव भास्करराव शेटय़े यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भंडारी मंडळाचे अध्यक्ष अशोक साळसकर, मुख्य चिटणीस व ‘हेटकरी’चे मावळते संपादक यश केरकर, अविनाश चमणकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजीव कीर, स्वागताध्यक्ष नाना हळदणकर, ‘हेटकरी’च्या नवनिर्वाचन संपादक पद्मा भाटकर या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. एखादे मासिक ७५ वर्षे चालविणे सोपे नाही, पण समाजाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले, असे आपल्या प्रास्ताविक भाषणात स्वागताध्यक्ष नाना हळदणकर यांनी सांगितले. ‘हेटकरी’च्या विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष मयेकर यांनी दिले. ज्ञातिसंस्थेचा कार्यक्रम ज्ञातीबाहेरील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून त्यात सर्व ज्ञातींतील गुणवंतांचा गौरव घडवून आणणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे, अशा शब्दांत समारंभाध्यक्ष भास्करराव शेटय़े यांनी समाधान व्यक्त केले. ‘हेटकरी’चे मावळते संपादक यश केरकर यांनी मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

साहित्य, नाटय़, कला या क्षेत्रातील गुणवंतांचा या वेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सर्वश्री श्रीकांत शेटय़े, रशीद साखरकर, शिरीष दामले, सतीश कामत, राजन मलुष्टे, श्रीकांत पाटील, सुहास भोळे, सर्व स्मिता राजवाडे, श्रद्धा राणे, जयश्री बर्वे, सनदी अधिकारी जयश्रीराणी सुर्वे यांचा समावेश होता. शतायुषी महादेव वांदरकर गुरुजी आणि माजी नगराध्यक्ष व नामवंत जहाज उद्योजक वसंतराव सुर्वे या ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. कद्रेकर यांनी सर्व सत्कारमूर्तीच्या वतीने कृतज्ञता प्रकट केली. डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि मसुरकर यांनी ‘हेटकरी’साठी लेखन करण्याचे स्वखुशीने घोषित केले. हा सत्कार चरित्रकार धनंजय कीरांचा आहे, असेही मसुरकर म्हणाले. सर्वश्री रशीद साखरकर, श्रीकांत पाटील, डॉ. नागवेकर आणि जयश्रीराणी सुर्वे यांची समयोचित भाषणे झाली.

या देखण्या समारंभाचे खरे सूत्रधार दूरदर्शन अधिकारी जयू भाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धनंजय कीर या श्रेष्ठ चरित्रकाराचे रत्नागिरीत चांगले स्मारक व्हावे, अशी इच्छा बोलून दाखविली. ज्ञातीबरोबरच गुणवत्तेचा विचार केल्यास मोठा सकारात्मक बदल घडेल असे ते म्हणाले. नवनिर्वाचित संपादक पद्मा भाटकर यांनी ‘हेटकरी’च्या नव्या स्वरूपाची कल्पना मांडताना विविध विषयांवरील समाजोपयोगी लेखनाचा समावेश करणार असे सांगितले. ‘हेटकरी’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना पद्मा भाटकर यांना समाजाभिमुख पत्रकारितेची उत्तम जाण आहे व त्याचा या मासिकाच्या कार्यासाठी लाभ होईल, असे मत मरीनर दिलीप भाटकर यांनी प्रकट केले.

भंडारी मंडळाचे अध्यक्ष अशोक साळसकर यांनी आभार प्रदर्शन केले. दीप्ती कानविंदे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. पसायदानाच्या गायनाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.