News Flash

करोनाचा गुणवंतांवरही ‘आघात’

‘यूपीएससी’ उत्तीर्ण  एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा मृत्यूशी संघर्ष;

‘यूपीएससी’ उत्तीर्ण  एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा मृत्यूशी संघर्ष; अकोला जिल्हय़ातील दोन घटनांनी समाजमन सुन्न

अकोला : करोनाच्या दुष्टछायेपासून कोणीही सुटले नाही. अनेक गुणवंत विद्यार्थीही उंच भरारी घेण्यापूर्वीच मृत्यूच्या दाढेत जाऊन अडकले. असाच मनाला चटका लावणारा मृत्यू अकोलेकरांनी अलीकडेच अनुभवला. ‘यूपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण केलेल्या जिल्हय़ातील दोन युवकांना करोनाने ग्रासले. करोनाविरुद्धच्या लढय़ात एकाचा अंत झाला, तर दुसऱ्या युवकाची झुंज सुरू आहे. करोना महामारीने गुणवंतांवरही केलेल्या ‘आघाता’मुळे समाजमन सुन्न झाले.

अकोला शहरातील जि.प. कॉलनी येथील  नाकट परिवारातील प्रांजल याने जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय ठेवून अत्यंत परिश्रमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण केली. करोना विरुद्धच्या लढाईत मात्र तो अयशस्वी ठरला. करोनाची बाधा झाल्यावर प्रांजलला (२५) वाचवण्यासाठी आईवडिलांनी शेवटपर्यंत धडपड केली.  प्रांजलचे बारावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातच झाले. पुण्यातील एका महाविद्यालयातील अभियांत्रिकीची पदवी घेतली. नवी दिल्ली येथे जाऊन त्याने यूपीएससीची तयारी केली. गेल्यावर्षी त्याने पहिली परीक्षा उत्तीर्ण  केली. त्यातच गेल्या महिन्यात प्रांजलला अकोल्यातच करोनाची लागण झाली. उपचार सुरू असतानाच त्याचे फुप्फुस मोठय़ा प्रमाणात बाधित झाले. तलाठी म्हणून कार्यरत असलेले वडील प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांनी मुलाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांच्या मदतीने लाखो रुपये जमा केले. हैदराबाद येथील रुग्णालयात हवाई रुग्णवाहिकेने अवघ्या एका तासात प्रांजलला हलवण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना प्रांजलच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. मात्र, शुक्रवारी प्रकृती आणखी बिघडल्याने प्रांजलचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत जिल्हय़ातील तेल्हारा येथील देवानंद सुरेश तेलगोटे या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण युवकालाही करोनाने ग्रासले. देवानंदचे वडील सुरेश तेलगोटे हे सैन्यामधून सेवानिवृत्त झाले आहेत.  देवानंदने मुंबईतील आयआयटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.  ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न पाहून कठोर परिश्रम घेतले.  मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली अन् मुलाखतीसाठी पात्र ठरला. गेल्यावर्षी देखील तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मुलाखत देण्यासाठी तो दिल्ली येथे गेला.

त्याठिकाणी त्याला करोनाने गाठले. देवानंद अकोल्यात परतल्यावर  ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनसाठीही चांगलाच संघर्ष करावा लागला. वडील सुद्धा करोनाबाधित झाल्याने देवानंदची जबाबदारी मित्रांवरच आली. स्थानिक मित्रांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली. उपचार सुरू असताना फुप्फुस ८० टक्के निकामी झाल्याने देवानंदला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी देवानंदचा करोनाविरुद्धचा लढा सुरू आहे. तो उपचाराला प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मित्रांनी १ कोटी उभारले..

देवानंद तेलगोटे हा सर्वसामान्य कुटुंबातील. आतापर्यंतच्या उपचारात तीन ते चार लाख रुपये खर्च झाले. हैदराबादला हवाई रुग्णवाहिकेतून नेण्यासाठी २४ लाख व पुढील उपचारासाठी ४० ते ५० लाखांचा मोठा खर्च. अशा कठीण परिस्थितीत देवानंदचा मित्र परिवार मदतीला धावून आला. त्यासाठी मित्र सुमित कोठे याने पुढाकार घेतला. देवानंदच्या प्रकृतीची माहिती विविध माध्यमातून इतर मित्रांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मित्रांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. जगभरात मोठ-मोठय़ा पदावर कार्यरत असलेल्या देवानंदच्या मित्रांनी एकजुटीने साथ देत उपचारासाठी सुमारे एक कोटी रुपये जमा केले. त्यातून देवानंदवर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याची माहिती सुमित कोठे याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:46 am

Web Title: meritorious students died due to coronavirus in akola district zws 70
Next Stories
1 कांद्याला चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
2 अधिकाऱ्याकडे ३ कोटींच्या खंडणीची मागणी; ८० हजारही लुटले
3 करोनामृतावर तहसीलदारांकडून सवंग प्रसिद्धीसाठी अंत्यसंस्कार
Just Now!
X