एमएचटी सीईटी २०२१ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी आज शेवटचा दिवस शिल्लक आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांचा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करू शकतात.
महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत साइट mahacet.org वर भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या एमएचटी सीईटी २०२१ लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पृष्ठ आपल्यासमोर उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी किंवा लॉग इन करावे लागेल. त्यानंतर अर्ज भरुन फी भरावी लागेल. ८ जून २०२१ रोजी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर ८ जुलैला तारीख वाढवण्यात आली होती.
‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा आता परिमंडळ स्तरावर
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून साडेतीन लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. त्यासाठी ३६ जिल्ह्य़ांतील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात येते. मात्र, यंदा करोनामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना अधिकाधिक परीक्षा केंद्रांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तालुका स्तरापेक्षा परिमंडळ स्तरावर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे.
औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा
राज्यात अभियांत्रिकीसाठी १,३४,३५६, औषधनिर्माणसाठी ५१,७३७, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी १,१४६, हॉटेल व्यवस्थापनासाठी १,२५२ जागा आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकी शाखेतील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याचे चित्र आहे. याउलट औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या १ लाख ३४ हजार ३५६ जागांपैकी ८० हजार जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे पन्नास हजारांवर जागा रिक्त राहिल्या होत्या.