‘मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र. माझ्या आसपास कुणीच नाही… हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला ‘मी’पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,’ अशी खोचक टीका शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. शरद पवारांच्या या टीकेला आणि मी पुन्हा येईन या मागील भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे. ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळ आहे. निवडणूक प्रचारावेळी तिचा मी उल्लेख केला. लोकांना ही ओळ आवडली. त्यात कोणताही गर्व नव्हता आणि कसला दर्पही नव्हता,’ असं मुलाखतीत फडणवीस म्हणाले.

गेल्या पाच वर्षात एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली, याचा आनंद असल्याचंही फडणवीस यांनी या सांगितलं. मला माझ्या मर्यादा आणि क्षमता माहीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मतं मागितली, असंही त्यांनी भाजपाला अतिअत्मविश्वास नडला का? या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत अजित पवारांबरोबर केलेल्या सत्तास्थापनेबाबतही मोठा खुलासा केला आहे. शनिवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी महिनाभरात झालेल्या सत्तानाट्यावर वक्तव्य केलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले. या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजपासोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दाव्यावर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.