गुजराती माणूस हा हुशार आहे हे आता कळतंय. गुजराती माणूस त्याच्याकडे कामाला गुजराती माणूस ठेवत नाही.  कधी तरी आपण त्यांच्या राज्यात जाऊन ते काय करतात हे बघितले पाहिजे. नुसतं पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. असे पुस्तक लिहिणारेच का यशस्वी होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबईत सोमवारी ‘मी उद्योजक होणार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे एकाच मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात का आले?, कारण इकडचं वातावरणच उद्योगधंद्यासाठी पोषक आहे. ओढूनताणून धंदा करता येत नाही. गुजराती माणूस हुशार आहे याबद्दल वाद नाही आणि हे आता कळतंच आहे. गुजराती माणूस त्याच्याकडे गुजराती माणूस कामाला ठेवत नाही. कारण तो गुजराती माणूस धंदा शिकेल आणि नवीन धंदा सुरु करेल अशी भीती त्यांना असते. आपण कधी तरी तिथे जाऊन शिकून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक वाचून धंदा करता येत नाही हे लक्षात ठेवा. असे पुस्तक लिहिणारे का यशस्वी होत नाही. याऐवजी हावरेंसारख्या लोकांनी लिहिलेले पुस्तक वाचा. त्यांचा प्रवास या पुस्तकात आहे. इतर कोणत्याही समाजाचा माणूस हा पुस्तक वाचून धंदा करतो असे दिसले नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी माणूस वडापाव विकतो असे सांगितले जाते. मात्र, तो धंदा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

घाबरुन कोणतीच गोष्ट होत नाही. चटके फटके खाल्ल्याशिवाय काहीच होत नाही असे सांगत त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचा दाखलाही या प्रसंगी दिला. तुमचं स्वप्न आणि तुमची हिंमत महत्त्वाची आहे. आपल्या राज्यात काय दडलंय याचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळू शकेल, असे राज ठाकरेंनी नमूद केले.

‘निवडणुकीसाठी फंड मागणार नाही’

तुम्ही यशस्वी उद्योजक झाल्यावर एकदा नक्की भेटायला या. तुमच्याकडे निवडणुकीसाठी फंड मागणार नाही. वाटल्यास निवडणुका झाल्यावर भेटायला या आणि यशस्वी झाल्याचे नक्की सांगा, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.