नरेंद्र मोदी यांच्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधलेले शरसंधान भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले असून त्याची परिणती राज यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात झाली आहे. सहयोगी पक्षाला विचारात न घेता मनसे केवळ आपल्या नेत्यांच्या सोईची तारीख निश्चित करते असा आरोप करत राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी न होण्याचे सुतोवाच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. दुसरीकडे मनसेने या कार्यक्रमांची तारीख भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेऊन निश्चित करण्यात आल्याचा दावा करत उपरोक्त आरोप फेटाळले आहेत. राज यांच्या विधानामुळे सत्ताधारी मनसे व भाजप आघाडीमध्ये बिघाडी होण्याचा श्रीगणेशा झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या राज यांनी गुरूवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शरसंधान साधले होते. पंतप्रधान हा एखाद्या राज्याचा नसतो, तो संपूर्ण देशाचा असतो. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता अशा शब्दात राज यांनी टीकास्त्र सोडले होते.  या विधानाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समाचार घेण्यास सुरुवात केली असताना त्याचे पडसाद नाशिक पालिकेत एकत्र नांदणाऱ्या मनसे व भाजप आघाडीत उमटणे स्वाभाविकच होते. या मुद्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मोदी यांच्याबद्दल राज यांनी काँग्रेसधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला. त्यांची ही भूमिका कायम राहिल्यास नाशिकमध्ये भाजप व मनसेची आघाडी ठेवायची की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असा सूचक इशारा दिला.पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढला. निकालानंतर मनसेशी युती करण्यात आली. तेव्हा शिवसेनेलाही सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे सावजी यांनी सांगितले. परंतु, काही कारणांमुळे शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही. सत्ता स्थापन झाल्यापासून मनसे भाजपला महत्वपूर्ण निर्णय घेताना डावलत आहे. सहयोगी पक्षाला कधी विश्वासात घेतले गेले नाही. तरी देखील भाजपने तक्रार केली नाही. राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम मनसेने आपल्या नेत्याच्या साईच्या तारखा पाहून निश्चित केले.  सहयोगी पक्ष म्हणून आम्हाला या कार्यक्रमांस भाजपचे प्रदेश पातळीवरील नेत्यांना बोलाविता आले असते. तथापि, तारखा निश्चित करताना भाजपला विचारात घेतले गेले नसल्याचा आरोप सावजी यांनी केला. त्यामुळे राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दौऱ्यातील त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. परंतु, भाजपच्या या आरोपांचे मनसेने खंडन केले आहे.
‘भाजपला विश्वासात घेऊनच तारीख निश्चिती’
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर नाशिक शहरात शनिवारी होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमांची तारीख निश्चित करण्यात आली. याआधी नरेंद्र मोदी यांची मुंबईत झालेली जाहीर सभा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकात्मता दौड यामुळे दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांवर भाजपने बहिष्कार टाकल्याची कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीत. आमचा सहयोगी पक्ष तसे काही करणार नाही.
अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर
स्थानिकांना बाजुला ठेवून नाशिकचा विकास ?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी महापौरांच्या रामायण बंगल्यावर आयुक्त संजय खंदारे यांच्यासमवेत खास बैठक घेऊन शहरातील विकास कामांवर चर्चा केली. परंतु, या बैठकीतून महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आ. वसंत गिते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना हद्दपार करण्यात आल्याचे सांगितले जाते. साधारणत: १५ ते २० मिनिटे राज आणि आयुक्त यांच्यात ही बैठक झाली. त्यात अन्य कोणालाही प्रवेश मिळाला नाही. या बैठकीत गोदा उद्यानासह शहरातील इतर प्रश्नांवर राज यांनी आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती महापौरांनी दिली. बैठकीपासून प्रमुख स्थानिक पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक सुरू असताना स्थानिक पदाधिकारी दालनाबाहेर ताटकळत होते. स्थानिकांना बाजुला सारून राज हे नाशिकचा विकास करु इच्छितात काय अशी चर्चा मनसेच्या गोटात सुरू आहे. या बैठकीनंतर राज यांनी स्थानिक आणि मुंबईहून आलेल्या वास्तुविशारदांशी चर्चा केली. त्यानंतर वास्तुविशारदांचा ताफा फाळके स्मारक व नेहरु वनौषधी उद्यानात भेटीसाठी रवाना झाला.