धुळ्यातील प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर बसगाडय़ा गोंदियाकडे रवाना

धुळे : छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या परप्रांतियांना राज्य परिवहनच्या घोळामुळे बसमधून गोंदियाजवळील सिमेजवळ सोडण्याऐवजी सेंधव्याजवळ सोडण्यात आले. तेथून परप्रांतियांना त्यांच्या गावांकडे जाण्यासाठी कोणतेच वाहन नसल्याने पुन्हा पायपीट करीत धुळ्यातील मदत कक्षात परतून मदत घ्यावी लागली. राज्यातील इतर ठिकाणच्या आगारांकडून झालेल्या चुकीमुळे स्थानिक प्रशासनाची अडचण होऊन ताण वाढला. यातून मार्ग काढत स्थानिक प्रशासन आणि राज्य परिवहन  अधिकाऱ्यांनी त्या परप्रांतियांना गोंदिया गावाजवळील सिमेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.

मुंबई शहर आणि उपनगरांमधून छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांकडे जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना राज्य परिवहनच्या बस चालकांनी गोंदियाच्या राज्य सिमेवर न सोडता मध्यप्रदेशातील सेंधवा गावाच्या सिमेजवळ सोडले. त्यामुळे गोंदियाकडे जाण्यासाठी या मजुरांना पुन्हा उलट प्रवास करून धुळ्याकडे यावे लागले. बुधवारी दिवसभरात नव्याने १५० परप्रांतीय मदत कक्षात दाखल झाले. मदत कक्षात अचानक वाढणाऱ्या या परप्रांतियांना पुन्हा गोंदियाकडे पाठविण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने व्यवस्था केली. गुरुवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ बसगाडय़ा पाठविण्यात आल्या. तेथे छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालला जाणाऱ्या परप्रांतियांना रांगेत उभे करुन त्यांची नावे नोंदविली गेली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात आला. यानंतर या गाडय़ा गोंदियाकडे रवाना झाल्या.

एसआरपी समादेशकांतर्फे औषधांचे वाटप

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या वतीने नगाव गावातील शेकडो ग्रामस्थांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. करोना महामारीच्या काळात या गोळ्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुणकारक ठरत असल्याची माहिती समादेशक संजय पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी सरपंच ज्ञानज्योती भदाणे, समादेशक संजय पाटील, उपअधीक्षक सदाशिव पाटील, पोलीस निरीक्षक नामदेव पवार, अविनाश चंद्र यांसह इतरांची उपस्थिती होती. समादेशक संजय पाटील यांनी  होमिओपॅथी औषध गावागावात वाटण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नगाव गावात औषधाचे वाटप करण्यात आले. हे औषध कसे आणि किती प्रमाणात घ्यावयाचे, याकरीता काय पथ्य पाळायचे, याची माहितीही समादेशक पाटील यांनी यावेळी दिली. ग्रामस्थांनी चांगल्या आहारासोबत योगाभ्यास करणे, व्यायाम करणे या गोष्टींचे पालन केले पाहिजे, असे सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी सांगितले.