सरावली ग्रामपंचायतीकडून लाखो टन घनकचरा खाडीत

हेमेंद्र पाटील, बोईसर

बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर सरावली खाडी पात्रात टाकला जाणारा लाखो टन घनकचरा खाडीत विसर्जित केला जात असल्याने येथील तिवरे जवळपास नष्ट झाली आहेत. याशिवाय मोठय़ा प्रमाणात खाडीचा भाग प्रदूषित झाला आहे. अनेक महिन्यांपासून खाडी पात्रात हा कचरा टाकला जात आहे.  मात्र खाडी पात्र प्रदूषित करणाऱ्या ग्रामपंचायतीवर आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

सरावली भागात मोठमोठय़ा नागरी संकुलांना परवानग्या दिल्या जात आहेत. सरावलीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.  संपूर्ण नागरी वसाहतीतून येणारा घनकचरा ग्रामपंचायत गोळा करून खाडी पात्रात टाकत आहे. याच खाडी पात्रात मोठय़ा प्रमाणात कांदळवन आहे. येथे कचरा टाकला जात असल्याने कांदळवनाला देखील बाधा निर्माण झाली आहे.

याबाबत मागील वर्षी पर्यावरण रक्षण संस्थांनी तक्रारीही  दाखल केल्या होत्या. परंतु अद्याप यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मध्यंतरी महसूल विभागाने देखावा म्हणून ग्रामपंचायतीला नोटीस बजावली होती.

सरावली येथे मोठे खाडी पात्र आहे. अनेक भागांतील लहानसहान नैसर्गिक नाले याच खाडी पात्राला येऊन मिळतात. याच खाडीत काही वर्षांपासून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.  दोन वर्षांपासून  ग्रामपंचायतीनेच खाडीचे पात्र प्रदूषित केल्याने या ठिकाणी बांधलेल्या विसर्जन घाटावर कोणीही फिरकले नव्हते. याच खाडी भागात काही ठिकाणी औद्य्ोगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आणि  गृह संकुलांचे सांडपाणी येते. परंतु एवढय़ावरच न थांबता  ग्रामपंचायतीनेच  खाडीभागात कचराभूमी तयार केली आहे. त्यामुळे  संपूर्ण खाडीचा परिसर

प्रदूषण झाला असून विद्रूप दिसत आहे.

बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर याभागातून जाताना मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.