News Flash

धार्मिक स्थळांसाठी आंदोलन सरकारला जागं करण्यासाठीच : इम्तियाझ जलील

तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन करू, जलील यांचा इशारा

“धार्मिक स्थळं उघडण्याबाबत आंदोलन करण्यामागे सरकारला जागं करणं हा एकमेव उद्देश होता. मंदिर, मशीदी आता उघडल्या पाहिजेत. तसंच सरकारला जे काही नियम लागू करायाचे आहेत तेदेखील त्यांनी करावेत. आज जेव्हा मी मशिदीत जाण्यासाठी निघालो तेव्हा मला पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतलं होतं,” अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

मशिद जाऊन उघडयाची आणि अनेक लोकं एकत्र जमवायची हा विचार यामागे नव्हता. सरकारनं धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत लवकरात लवकर काही निर्णय घ्यावा हा यामागील उद्देश होता. काल मंदिरासाठी आंदोलन केलं आणि मशिदीत जाण्यापासून थांबवलं याचा अर्थ आम्ही आंदोलन थांबवलं असा होत नाही. आम्ही आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलं.

“धार्मिक स्थळं खुली करणं ही लोकांची भावना आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर करत आम्ही आंदोलन करत आहोत. यानंतर सरकार कमीतकमी जागं होईल ही अपेक्षा आहे. आज आम्ही औरंगाबादमध्ये आंदोलन केलं. परंतु जर धार्मिक स्थळं खुली केली नाहीत तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला. तसंच हे होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असंही जलील म्हणाले.

धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पोलीस यात काहीही करू शकत नाहीत. आम्ही पोलिसांच्या कामाचा आदर करतो. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आम्ही लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आधारावर पुढे काम सुरू ठेवणार असल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 5:30 pm

Web Title: mim leader mp imtiyaz jaleel religious places movement is just wake up government jud 87
Next Stories
1 पालघरच्या जिल्हाधिकारीपदी एम. जी. गुरसळ यांची नियुक्ती
2 ठाकरे सरकारकडून ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली
3 …आम्हाला अक्कल शिकवत आहेत, एकनाथ खडसेंचा पक्षाला घरचा आहेर
Just Now!
X