News Flash

“पूजाच्या आई-वडिलांना राठोड यांनी पाच कोटी रुपये दिलेत; त्यामुळेच त्यांना हत्येविषयी काही बोलायचे नाही”

"मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका आहे"

( पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर शांताबाई राठोड आणि त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई )

“पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करून २० दिवस होत आले आहे. त्या प्रकरणाशी संबधित मंत्री संजय राठोड यांनी काल(दि.२८) राजीनामा दिला आहे. पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेऊन, या प्रकरणात लक्ष घालावे आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे”, अशी भूमिका पूजा चव्हाण यांच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी आज(दि.१) पोलिस आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर मांडली.

“पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही” असा आरोपही यावेळी बोलताना पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी शांताबाई राठोड म्हणाल्या की, “पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही काही बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे”. तसेच, “मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका आहे”, असेही शांताबाई राठोड म्हणाल्या.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर वाढत्या दबावामुळे काल(दि.२८) राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव होता. अखेर काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राठोड यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अशा अनेक विषयांवर ते यावेळी बोलले. या पत्रकार परिषेदपूर्वी पूजाचे आई-वडिल आणि बहिण उद्धव ठाकरेंना भेटले. या  भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. पूजा चव्हाण प्रकरणात होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

(‘संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही’, पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 3:27 pm

Web Title: minister sanjay rathod sent 5 crore rupees to pooja chavans mother and father thats why they are silent on the murder allegations by shantabai rathod svk 88 sas 89
Next Stories
1 विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले…
2 “तिच्याशी लग्न करणार का?,” शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला सुप्रीम कोर्टाचा सवाल
3 “आम्ही भिकारी नाही,” फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Just Now!
X