News Flash

कुंभमेळा मंत्र्यांच्या खेळीने लोकप्रतिनिधींचा पत्ता कट

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शासन स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सहा वेगवेगळ्या समितींची स्थापना केली आहे.

| July 19, 2015 07:31 am

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अंमलबजावणीत राज्य-केंद्र शासन यांच्यात समन्वय राखण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या केंद्रीय समितीच्या समन्वयकपदी स्थानिक खासदारांना डावलत राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खासगी स्वीय सहायकाची वर्णी लावल्याची बाब पुढे आली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपचे आमदार व खासदार आहेत. असे असताना पालकमंत्र्यांनी शासनाने अद्याप नियुक्त न केलेल्या खासगी स्वीय सहायकाची सिंहस्थ समितीवर नियुक्ती करून नेमके काय साधले, असा प्रश्न आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शासन स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सहा वेगवेगळ्या समितींची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त समित्यांची रचना आहे. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. केंद्र व राज्यात समन्वय साधण्यासाठी याव्यतिरिक्त केंद्रीय समितीची देखील स्थापना केली गेली आहे. या समितीच्या समन्वयकपदी महाजन यांचे खासगी स्वीय सहायक रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जलसंपदामंत्र्यांच्या कार्यालयाने सामान्य प्रशासन विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, याच व्यक्तीची स्वीय सहायकपदी नियुक्ती करण्यासाठी महाजन यांनी तीन वेळा सामान्य प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार केला; परंतु संबंधित विभागाने रामेश्वर यांच्या नेमणुकीचे आदेश अद्याप काढलेले नाहीत. म्हणजे शासनलेखी जी व्यक्ती मंत्र्यांची अधिकृत खासगी स्वीय सहायक झालेली नाही, त्यास केंद्रीय समितीवर समन्वयक बनवल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री महाजन यांच्या आस्थापनेवर नाशिक येथील कार्यालयात निम्नस्तरीय शासकीय कर्मचाऱ्याची स्वीय सहायक म्हणून केलेली नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. ही बाब लक्षात आल्यावर ‘जलसंपदा’तील त्या सहायकाची हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढावली. केंद्रीय समितीच्या नियुक्तीबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

खासदारांना आश्चर्य
केंद्र व राज्यात समन्वयाचे काम स्थानिक खासदार अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांना कुंभमेळ्यातील नियोजनाची माहिती आहे. असे असताना पालकमंत्र्यांनी ज्येष्ठांचाही विचार न केल्याबद्दल खासदारद्वयींनी आश्चर्य व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 7:31 am

Web Title: ministers boycott local politicians for kumbh mela
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 कृष्णा खोऱ्यात पावसाच्या मध्यम सरी
2 सांगली, मिरज शहरात ईदनिमित्त सामूहिक नमाज
3 मराठवाडय़ात सर्वत्र ईद उत्साहात साजरी
Just Now!
X