श्रीरामपूर : गेली साडेतीन वर्षे बेपत्ता असलेल्या भोकर ( ता.श्रीरामपूर ) येथील भाऊसाहेब कारभारी फु लसौंदर ( वय ५३ ) हे समाजमाध्यमांमुळे पुन्हा घरी परतले. जम्मू काश्मीर भागात त्यांचे वास्तव्य असताना जवान व पोलिसांच्या सहृदयतेमुळे अशांत खोऱ्यातही मनोरुग्ण असलेले भाऊ साहेब घरी आले आहेत.  समाजमाध्यमांमुळे जमावाच्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत दहाहून अधिक लोक मारले गेले असताना ही सकारात्मक बाजू सामोरी आली आहे.

साडेतीन वर्षांपूर्वी भाऊ साहेब हे श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर आले. जम्मू तावी एक्सप्रेस या रेल्वेत बसले. तेथून थेट काश्मीर भागात भटकत राहिले. नाव, गावही ते विसरले होते. दाढी वाढलेले भाऊ साहेब हे अतिरेकी असावे म्हणून अनेकदा त्यांची पोलीस चौकशीही झाली. पण सत्यता पटल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी ते पूँछ भागात आढळले होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना आणण्यासाठी घरचे लोक गेले असता ते तेथून निघून गेले होते. तेथून ते लेहला गेले. सोनई व संगमनेर भागातील काही डॉक्टर लेहला फिरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना भाऊसाहेब भेटले. ते त्यांच्याशी मराठीत बोलले, पण त्यांना नाव सांगता आले नाही. त्यांनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ भोकर येथील अशोक ढोकणे या लखनऊ  येथे सैन्य दलात असलेल्या जवानाने पाहिला. त्याने सर्व जवानांना तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविला.

लेह येथील पोलीस निरीक्षक शाहरुख यांनी व्हिडीओ पहिला. जवान ढोकणे यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांना लेहमध्ये भाऊ साहेब यांचे वास्तव्य असल्याचे दिसले. त्यांनी भाऊसाहेब यांना घरी नेले. तेथेच ठेवून घेऊ न ढोकणे यांना कळविले. आठ दिवसांपूर्वी भाऊ साहेबचा भाऊ रावसाहेब फुलसौंदर ,गजानन शिंदे हे मोटार घेऊ न लेहला गेले. भाऊ साहेब यांची त्यांच्याबरोबर भेट झाली.  निरीक्षक शाहरुख यांनी भाऊ साहेब यांना नवीन कपडे भेट देऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.