सन २०११ साली प्रवरा डाव्या कालव्याचे प्रवेशद्वार उघडून केलेल्या आंदोलनप्रकरणी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह सचिन गुजर, सुभाष पटारे यांना संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली. सायंकाळी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीकडे पाणी सोडल्यानंतर दि. ३० नोव्हेंबर २०११ रोजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आंदोलन करून प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याचे दरवाजे उघडून दिले. साखळय़ा व फळय़ांची तोडफोड करण्यात आली. त्या वेळी आमदार कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार कांबळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे हे संगमनेर तालुका पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चैदाने यांच्या न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सोडण्यात आले.
सन २०११ मध्ये मोठी पाणीटंचाई असताना राज्य सरकारने भंडारदरा धरणाचे पाणी मराठवाडय़ात जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात आमदार कांबळे व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते.