लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळाप्रकरणी अटक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी ही घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केवळ स्वार्थापोटी पक्ष सोडल्याची टीकाही त्यांनी केली. सामंत यांनी काँग्रेस आघाडीच्या काळात विविध पदांचा उपभोग घेऊन स्वार्थासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले. पण सदासर्वकाळ दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत त्याचा वचपा घेतला जाईल, असेही तटकरे यांनी बजावले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात रत्नागिरीपासून करत असल्याचे सांगून तटकरे म्हणाले की, पक्षसंघटनेला बळकटी आणून पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. काही ठिकाणी पुनर्रचनाही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री भास्कर जाधव यांनी मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याचे सांगितले. कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची गती कुंठित झाली आहे. अशा वेळी जुने मतभेद विसरून या सरकार विरोधात उभे ठाकण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम इत्यादींची मेळाव्यात भाषणे झाली.

सोलापूर जिल्ह्यतील मोहोळ येथील आमदार कदम यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
****
गेल्या १८ जुलला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरारी होते. गेल्या सोमवारी पहाटे त्यांना पुण्यात अटक झाली.