राष्ट्रवादी आघाडीतील तीन सदस्यांना केवळ राजकीय कारणातूनच अपात्र ठरवण्यात आले. राज्यातील सत्तेचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न शिवसेनेने केल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी अभिषेक कळमकर यांच्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. कळमकर यांच्या निवडीचा घोषणा होताच सभागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
जगताप म्हणाले, महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळेच विरोधकांनी लोकशाहीला मारक ठरणारी कृती केली. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. राष्ट्रवादी-काँग्रेस-मनसे व अपक्षांची आघाडी अभेद्य राहिल्याने शिवसेनेचे मनसुबे उधळले गेले, असे जगताप म्हणाले. शहरातील विकासकामांबाबत मनसेला राष्ट्रवादीबद्दल विश्वास असल्यामुळेच ते आमच्याबरोबर खंबीरपणे राहिले, असे त्यांनी सांगितले.
अभिषेक कळमकर यांचे काका दादा कळमकर यांनी विजयाचे श्रेय जगताप पिता-पुत्रांना दिले. काँग्रेस, मनसे व अपक्षांनीही राष्ट्रवादीवर विश्वास टाकला. जगताप पिता-पुत्रांनी सर्वस्व पणाला लावून अभिषेकला महापौर केले. यापुढे आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहराच्या राजकारणात त्यांना ताकद देऊ, असे कळमकर म्हणाले.
नवे महापौर कळमकर यांनी राष्ट्रवादीसह काँग्रेस, मनसे व अपक्षांनी आपल्याला खंबीर साथ दिली असे सांगितले. ते म्हणाले, या सर्वासह नागरिकांचा विश्वास आपण सार्थ ठरवू. सर्वाना बरोबर घेऊन शहर विकासाला चालना देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऐनवेळी पळापळ
महापौरपदाच्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीचे संख्याबळ तब्बल आठने घटले. राष्ट्रवादीचे १८, काँग्रेसचे ११, मनसेचे ४ आणि ५ अपक्ष अशी त्यांची संख्या होती. आता राष्ट्रवादीचेच बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे संजय लोंढे हे पहिल्यापासून ऐनवेळी मुदस्सर नझर, ठाणगे असे चौघे विरोधकांच्या तंबूत सामील झाले. तिघांच्या अपात्रतेमुळे यात आणखी वाढ झाली. यातील काही नगरसेवक सोमवारी पहाटेपर्यंत एकीकडे होते, नंतर पळापळ करून ते दुस-या गोटात सामील झाले.
ऐनवेळी कर्डिलेही रिंगणात
शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करताना मनसेसाठी अगदी शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांचे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही रिंगणात उतरवले होते. त्यांनीही सोमवारी सकाळी मनसेच्या नगरसेवकांना गळ घातली. मात्र मनसेच्या नगरसेवकांचे मतपरिवर्तन करण्यात त्यांनाही अपयश आले.