चितळे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना नेहरू मंडईची मोकळी जागा दिल्यानंतरही गैरसोयीची कारणे देऊन भाजी विक्रेत्यांनी सोमवारी पुन्हा रस्त्यावरच ठाण मांडल्याने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांना पुन्हा या मोकळ्या जागेवरच पाठवले. मात्र शिवसेनेचे नगरसेवक विक्रम राठोड यांनी मनपाच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तो मनपाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी हाणून पाडला. भाजीविक्रेते पुन्हा रस्त्यावर बसल्यास त्यांच्या कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
मनपाने नेहरू भाजी मंडईची जुनी इमारत पाडल्यानंतर गेल्या चार-पाच वर्षांपासून ही जागा मोकळीच आहे. या जागेवर भाजी मंडईसह व्यापारी संकुल बांधण्याचा मनपाचा प्रयत्न सातत्याने फसला आहे. खासगीकरणातून हे संकुल बांधले जाणार आहे, मात्र त्याला विकसकांचा प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे ही जागा मोकळी पडून आहे आणि येथील भाजीविक्रेते तेव्हापासून चितळे रस्त्यावरच ठाण मांडून आहेत.
मनपाने अलीकडेच या भाजीविक्रेत्यांना नेहरू मंडईची मोकळी जागा उपलब्ध करून दिली, मात्र ही नवलाई दोनच दिवस टिकली. भाजीविक्रेते या मोकळ्या जागेत गेल्यानंतर चितळे रस्त्याचा श्वास मोकळा झाला होता. येथील रहदारी ब-यापैकी सुरळीत झाली होती. मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही. दोनच दिवसांत सोमवारी या भाजीविक्रेत्यांनी नेहरू मंडईची मोकळी जागा सोडून पुन्हा चितळे रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा रहदारीची कोंडी सुरू झाली आहे. ती लक्षात घेऊन सोमवारी सकाळी या भाजीविक्रेत्यांना रस्त्यावरून उठवले. येथे पथारी मांडण्याचा प्रयत्न मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हाणून पाडला. पथकाचे प्रमुख सुरेश इथापे भाजीविक्रेत्यांना येथे न बसण्याचे आवाहन केले. मात्र त्याला त्यांनी विरोध केला. काही काळ येथे गोंधळ उडाला. मात्र लगेचच उपायुक्त चारठाणकर येथे आले. भाजीविक्रेत्यांच्या मागणीनुसारच त्यांना नेहरू मंडईची मोकळी जागा देण्यात आली, आता रस्त्यावर बसता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा कारवाईचा इशारा दिला.
दरम्यान, नगरसेवक विक्रम राठोड हेही येथे आले, त्यांनी मनपाच्या या कारवाईला विरोध केल्याने येथे काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र चारठाणकर त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे राठोड येथून निघून गेले, मात्र शहरातील अन्य ठिकाणची अतिक्रमणे येत्या तीन दिवसांत काढून टाकावी, अन्यथा हे भाजीविक्रेते पुन्हा रस्त्यावर बसतील असा इशाराही त्यांनी दिला.