सांगलीतील कुपवाड बाजारपेठेत मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील कुपवाड बाजार पेठेत आज आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या परप्रांतीयांना कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.
सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये २५ हजाराहून अधिक परप्रांतीय काम करतात. ते दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी या बाजारपेठेत येतात.

कोणत्याही कागदपत्राची पडताळणी न करता या लोकांना काम दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी अनेकदा जिल्हा प्रशासन आणि कामगार आयुक्तांकडे केली आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे मनसेने परप्रांतियांविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येसोबत गुन्हेगारी देखील वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात १६ पिस्तुले जप्त करण्यात आली. या घटना परप्रांतीयामुळेच घडत आहेत, असा आरोपही मनसेने केलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान परप्रांतीय नागरिकांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती एमआयडीसीचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.