मनसेने राज्यात भाजप व नरेंद्र मोदींशी गुप्त समझोता केला असूनही शिवसेना मोदी व भाजपच्या मागे फरफटत चालली असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तर केंद्रिस्त झालेली सत्ता भ्रष्ट होत जाते, असे नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीवर टीकास्र राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष ना. शरद पवार यांनी सोडले.
सावंतवाडीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे, संपर्कमंत्री उदय सामंत, उमेदवार डॉ. नीलेश राणे, खासदार भालचंद्र मुणगेकर, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत, प्रवीण भोसले, प्रसाद रेगे, व्हिक्टर डॉन्टस आदी उपस्थित होते.
देशाच्या विकासाचा विचार करणाऱ्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. वाजपेयी सरकार केंद्रात आले तेव्हा घटनेचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय भाजपने घेतला व त्यामुळे एकाधिकारशाही, हुकूमशाही आणण्याचे स्वप्न पाहणारे संधी मिळेल तेव्हा छुपा अजेंडा राबवतील असा इशारा चव्हाण यांनी दिला.
गुजरात पॅटर्नचा गवगवा होत आहे. पण मुख्यमंत्री नरेंद्र मोदी खोटे चित्र उभे करत आहेत. आज महाराष्ट्र राज्य गुजरातपेक्षा आघाडीवर आहे असे सांगत महाराष्ट्र व गुजरातची तुलना एकाच व्यासपीठावर येऊन चर्चेतून करण्याचे आवाहन मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले. मोदींनी भाजपला हायजॅक केले व अडवाणींसह ज्येष्ठांचा अपमानही केला असे भाजपतील नेतेच बोलत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
भाजपने एकच फोटो आणि एकाच नावाची मोदी हुकूमशाही प्रवृत्ती पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याची टीका करत लोक मोदींची नौटंकी ओळखून आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळेल, असे चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदी एकाधिकारशाहीसारखे उमेदवार असून केंद्रिस्त सत्ता भ्रष्ट असते असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भारत देशातून धान्य १८ देशात निर्यात होत असून ३२ हजार कोटींचे परकीय चलन मिळविणारा देश बनला आहे. जगात तांदूळ निर्यात करण्यात भारत प्रथम आहे. त्यात कोकणचा वाटा आहे असे पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, पण पंतप्रधान निवडण्याची पद्धत भाजपला मान्य नसल्याने त्यांची ही हुकूमशाही त्यांनी लोकांसमोर ठेवल्याचे पवार म्हणाले. गुजरात विकासाचे मॉडेल नाही. महाराष्ट्र व गुजरात एकाच वेळी निर्माण झालेली राज्ये आहेत. मोदींच्या काळात गुजरातची अधोगती झाली असून गुजराती बांधवांचे विकासाचे प्रयत्न मोदींना श्रेय घेता येणार नाही, असे पवार म्हणाले.
महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर किंवा टेलिव्हिजनवर येऊन बोलण्याचे आवाहन पवार यांनी केले. गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांनी अहमदाबादमधील जळीत हत्याकांडाला भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही. या देशात नवीन हिटलर बनविण्याचे स्वप्न भाजपने बाळगल्याचे त्यांनी टीका करून शिवसेना भाजपचा समाचार पवार यांनी घेतला.
यावेळ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपचा समाचार घेतला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. कोकणच्या विकासात यांचा काही संबंध नाही, असे राणे म्हणाले.
यावेळी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, उमेदवार डॉ. नीलेश राणे, खासदार भालचंद्र मुणगेकर, सतीश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वानीच नरेंद्र मोदी सरकार, सेना भाजप युतीवर टीका केली. यावेळी काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.