मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार असून या लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंब मोदींना निमंत्रण देणार का?, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या प्रश्नावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचा लग्नावर विश्वास आहे का?, असे सांगत राज ठाकरे यांनी प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून मुंबईतील सेंट रेजिस येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याविषयी राज ठाकरेंना शनिवारी प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, अमितचं लग्न साधेपणाने करणार आहोत. मी दोन- तीन महिन्यांपूर्वी सहज आकडा काढला तर हा आकडा माझा पक्ष, इतर पक्ष, सामाजिक संस्था, मित्र- पत्रकार असे मिळून किमान साडे पाच ते सहा लाखांच्या घरात गेला. त्यामुळे सर्वांना लग्नात बोलावणे शक्य नाही. आमच्या हौसेसाठी दाम्पत्याची फरफट करणेही योग्य नाही. माझ्याच पक्षाचा विचार केला तर फक्त मुंबईतील गटाध्यक्षांची संख्याच ११ हजार होती. आता लग्नात ते एकटे येणार नाहीत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही असतीलच,  हे सगळं हाताबाहेरचे प्रकरण असल्याने मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलावणार, असे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींना लग्नाची पत्रिका देणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, मोदींना लग्नावर विश्वास आहे का?. राज ठाकरेंच्या या प्रति प्रश्नाने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. दरम्यान, शुक्रवारीच राज ठाकरेंनी अमित आणि मितालीच्या लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवून देवीचे आशीर्वाद घेतले होते.