मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. आरक्षणाच्या भूमिकेवर सरकार वेळकाढूपणा करत असून याबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नोकरभरतीत १६ टक्के आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. पण ते आरक्षण मिळेलच यांची खात्री काय, असा सवाल उपस्थित केला. मराठा आरक्षणावरून पंढरपुरात निर्माण झालेल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण राज्यभरातून वारकरी आले आहेत. महाराष्ट्राच्या श्रद्धेचा हा विषय आहे. त्यामुळे त्याला गालबोट लागता कामा नये, असा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला.

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज जालना येथे आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीकास्त्र सोडले.

मोदींनी गेल्या ४ वर्षांत फक्त नोटाबंदी, योग, जीएसटी आणि स्वच्छ भारत यावरच वाया घातल्याचे सांगत मोदींना त्यांच्या मतदारसंघातील नदीही स्वच्छ करता आली नसल्याचा टोला लगावला. पंतप्रधान झाल्यावर मोदी बदलले. मग माझी त्यावेळची भूमिका मी तशीच ठेवायची का, असा सवाल करत मला गुजरातमध्ये त्यावेळी जे दाखवले होते. त्यावर मी त्यावेळी बोललो होतो. पण परिस्थिती नंतर बदलली.

मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने खोटे बोलतात. १ लाख २० हजार विहिरी बांधल्याचा दावा ते करतात. मराठवाड्यातील स्थिती पाहा काय झाली आहे. जालना शहराला १५ दिवसाला एकदा पाणी येते. मग कुठे गेल्या या विहिरी असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्राचे वाळवंटीकरण होत असल्याचे त्यांनी इस्त्रोचा हवाला देत सांगितले. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावाही फडणवीस करतात. पण वस्तुस्थिती तशी नसल्याचेही त्यांनी सांगितले.