“८ नोव्हेंबर हा पुलं देशपांडेच्या स्मृती जागवण्याचा दिवस. पण मोदी सरकारने नोटबंदी आणून हा काळा दिवस करुन टाकला,” असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपर यांनी लगावला आहे. काळ्या पैश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण झाली. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर खोपरकांनी आजच्याच दिवाशी असणारी पुलं यांची जयंती आणि नोटबंदीची सांगड घालून मोदी सरकारवर टीका केली आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता मोदींनी देशवासियांना संबोधित करताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाच धक्का दिला. हा निर्णय फसला की यशस्वी ठरला यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमातांतरे आहेत. यावरुनच आज विरोधकांनी नोटबंदीचा निर्णय हे संकट होते अशा आशयाचा #DeMonetisationDisaster हा हॅशटॅग वापरुन या निर्णयावर टीका केली आहे. यामध्येच खोपर यांनाही मोदी सरकावर टीका केली आहे.

“खरंतर, ८ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे पु.ल. देशपांडे यांची आठवण जागवण्याचा दिवस पण उन्मत्त मोदी सरकारने ८ नोव्हेंबर म्हणजे काळा दिवस करुन टाकला. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणाऱ्या नोटाबंदी निर्णयाला तीन वर्षं झाली. या आर्थिक आणीबाणीच्या काळात पुलंनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याची प्रेरणा भारतीयांना मिळो, हीच अपेक्षा,” असं ट्विट खोपर यांनी केलं आहे.

दरम्यान, आज नोटबंदीला तीन वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला,” असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.