करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. दरम्यान, आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झालं असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील ग्रंथालंय सुरू करण्यास मात्र सरकारनं अद्यापही परवानगी दिलेली नाही. राज्यातील ग्रंथालयं सुरू करावी, या मागणीसाठई ग्रंथालय प्रतिनिधींनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान ग्रंथालयाच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्वरित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसंच चर्चेदरम्यान सामंत यांनी लवकरात लवकर राज्यातील ग्रंथालयंदेखील सुरू करण्यात येतील आणि दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन राज ठाकरे यांना दिलं.

पुस्तकांमुळे ऊर्जा मिळते आणि वैचारिक आनंदही मिळतो. सध्याच्या करोना महासाथीच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे. लॉकडाउनमध्ये बंद करण्यात आलेली ग्रंथालयं पुन्हा सुरू करावी. तसंच यावर अंवलंबून असलेल्या अर्थचक्राला गती मिळेल, असं म्हणणं प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडलं. यापूर्वी हॉटेल चालक, मुंबईचे डबेवाले, डॉक्टर्स, जिमचे चालक हे देखील आपल्या मागण्यांसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.