News Flash

प्रिय निर्भया… शालिनी ठाकरे यांचं हिंगणघाट प्रकरणावर काळीज पिळवटून टाकणारं पत्र

शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्याच शब्दात वाचा

वर्धा जिल्ह्यातील दारोडा गावासाठी सोमवारची सकाळ भूकंपाच्या धक्क्यासारखी ठरली. दारोडा गावची प्राध्यापक लेक हिंगणघाट येथे महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला जिवंत जाळलं. आगीनं होरपळलेल्या पीडितेचा  सोमवारी उगवत्या सूर्याबरोबरच श्वास तुटला. काही क्षणात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि संतापाची लाट उसळली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. सर्वसामान्य जनतेतून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही या घटनेवर काळजाला हात घालणार आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार पत्र लिहिलं आहे.

शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र त्यांच्याच शब्दात…

प्रिय निर्भया,

कुणी तरी तुझ्यावर अ‍ॅसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं… मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये. तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो- ‘निर्भया’. जी कुणालाही घाबरत नाही. जिला कसलंही भय नाही ती ‘निर्भया’!

महिलांना समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि त्यातून महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला ‘निर्भया’ हे नाव ठेवणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं.

त्यानंतर दोन-चार दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयीच्या बातम्या येतात. मोठमोठे लेख लिहिले जातात. ‘निर्भया’च्या वैद्यकीय उपचारांचा खर्च आम्ही करू असं सरकार जाहीर करतं…!
कारण हे सगळं सोपं आहे गं, आमच्यासाठी.
तुझ्यावर घरात, शाळा-कॉलेजात, रस्त्यात किंवा अगदी ट्रेनमध्ये अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा तुझा वैद्यकीय खर्च उचलणं सोपं आहे, पटतंय ना!

मग एक दिवस तू थकतेस. दमतेस आणि शेवटचा श्वास घेऊन मोकळी होतेस.

आठ वर्षांपूर्वी तू दिल्लीत होतीस. तीन वर्षांपूर्वी नगरला. गेल्या महिन्यात पुण्यात आणि मागच्याच आठवड्यात हिंगणघाटात! पण चिंता करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी, म्हणून आम्ही वर्षानुवर्षं न्यायालयात तुझी बाजू मांडू! आणि पुढची १० वर्षं त्या न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करू.

आणि हो, एक राहिलंच.
तुझ्यासाठी एक मेणबत्ती मोर्चाही काढू!

तुझीच,
सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 3:21 pm

Web Title: mns leader shalini thackeray wrote letter to nirbhaya after hinganghat burn incident bmh 90
Next Stories
1 हिंगणघाट पीडितेच्या अंत्यसंस्कारासाठी भावाची प्रतीक्षा
2 हिंगणघाट जळीतकांड: “पोलिसांना बंदुका फक्त हवेत गोळी मारायला दिल्यात का?”
3 हिंगणघाट जळीतकांड: महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही, आरोपीला फासावर लटकवू – उद्धव ठाकरे
Just Now!
X