ठाणे जिल्ह्यात लशीच्या तुटवड्यामुळे मागील काही दिवसांपासून रडतखडत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला आता वेग आल्याचे चित्र आहे. मात्र असं असलं तरी कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये पुरेश्याप्रमाणामध्ये मोफत लसी उपलब्ध नसल्याची तक्रार केली जातेय. यावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्र्यांना वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का असा रोकठोक सवाल राजू पाटील यांनी लसतुटवड्याबद्दल नाराजी व्यक्त करताना उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> सिद्धिविनायक मंदिरात मागच्या दाराने प्रवेश भावोजी मुख्यमंत्र्यांच्या ‘आदेशा’ने देतात का?; ‘मनसे’चा सवाल

गेल्या महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये मोफत लसीकरण बंद असून खासगी रुग्णालयांसमोर रांगा लागलेल्या असताना तुम्ही मोफल लसीकरण शिबीर चालवताय असा प्रश्न राजू पाटील यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आम्ही लसी विकत घेऊन त्या मोफत वाटत आहोत. प्रशासनानेही लसी विकत घेऊन मोफत दिल्या पाहिजेत असं सांगतानाच आम्ही हे करोना संपवण्यासाठी केलेलं एका प्रकारचं आंदोलन असल्याचं पाटील म्हणाले. याच प्रतिक्रियेचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधाणारी कॅप्शन दिलीय. “काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला ? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन,हे आता चालणार नाही,” असं राजू पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर करोनाच्या विरोधात आहे. केंद्रातील मोदी सरकारनेच सणांच्या काळात संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत काळजी घेण्यास व गर्दी रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यास राज्य सरकारला सांगितले आहे याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित केला. तसेच सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात उभारलेल्या प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या भाषणात आंदोलन करायचं असेल तर करोना संपवण्याचं आंदोलन करा असा खोचक टोला भाजपाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता लगावला.

नक्की वाचा >> कल्पिता पिंपळेंना राज ठाकरे म्हणाले, ”तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकी…”

करोनाचे संकट दिसत असताना आरोग्यविषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खूप दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेतला. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी अशी सूचना राज्याला पत्र पाठवून केली आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे.  आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत, असेही ठाकरे यांनी सुनावले.