मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मातोश्री  या त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावलं आहे. मनसेच्या या बॅनरमध्ये वीज बिलांवरुन ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा मजकूर लिहून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री वाढीव वीज बिलांचं काय झालं? असा सवालही या बॅनरद्वारे विचारण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली. याबाबत आधी वीज बिलांमध्ये सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तशी कोणतीही सवलत देण्यात आली नाही. लॉकडाउनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. त्यामुळे सरकारने वाढीव वीज बिलांचा विचार करावा असं आवाहन मनसेने केलं होतं. तसंच भाजपानेही वारंवार लोकांना वाढीव वीज बिलांमधून सवलत द्यावी अशी मागणी केली होती. मात्र यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. आधी आश्वासन देण्यात आलं आणि नंतर घूमजाव करण्यात आलं. त्यामुळे मनसेने नव्या वर्षाच्या शुभेच्छांचं बॅनर लावत असतानाच त्याच बॅनरमधून मुख्यमंत्र्यांना वाढीव वीज बिलांवरुन प्रश्न विचारत टीका केली आहे.

वाढीव वीज बिलं माफ केली जावीत अशी मागणी करण्यात आली होती. भाजपा आणि मनसेनेही मागणी केली होती. मात्र आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही. आता बॅनरमधून टीका करत मनसेने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.