मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेने झेंड्यात राजमुद्रेचा वापर केल्याने विरोध दर्शवला आहे. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी पुणे पोलिसांकडे दिलं आहे. गुन्हा दाखल न केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, ‘कोणत्याही राजकीय पक्षाने राजमुद्रेचा वापर करणं चुकीचं असून प्रांत, भाषा, जात-धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. राज ठाकरे यांच्याविरोधातही राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केलं जाईल’.

आणखी वाचा – मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला – संभाजी ब्रिगेड

मनसेने झेंड्यावर वापरलेल्या शिवमुद्रेचा अर्थ काय ?
जाणता राजा, रयतेचे वाली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे.

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

आणखी वाचा – मनसेने झेंड्यावर वापरलेल्या शिवमुद्रेचा अर्थ काय ?

खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.