मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूंनी जागरुक राहिलं पाहिजे असं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी देशावर प्रेम करणाऱ्या तसंच मराठी मुस्लिमांनाही जागरुक राहण्याचं आवाहन करत घुसखोरी करणाऱ्यांची तसंच षडयंत्र रचणाऱ्यांची माहिती पुढे येऊन दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सीएएविरोधात मोर्चा काढणाऱ्यांना मुस्लिम नागरिकांना सुनावताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, “तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलं आहे ते जगात इतर कुठल्याही देशात दिलं जात नाही. एकोप्याने राहा. ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करण्याच्या मागे का लागला आहात”. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा महामोर्चा काढण्यात आला होता.

“रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी मला एकाने पासपोर्ट आणून दिला होता, जो बांगलादेशचा होता. त्यात येण्याची एंट्री होती पण जायचं काय. फक्त बांगलादेशातून दोन कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणाहून किती घुसखोर आले याची काहीच माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो. एरव्ही आम्हाला काही फरक पडत नाही,” अशी खंत राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली.

मराठी मुस्लीम राहतात तिथे दंगली नाही –
“जेथे मराठी मुस्लीम राहत तिथे कधी दंगली झालेल्या नाहीत. पण आज असे अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत जिथे पाकिस्तान, बांगलादेशमधील मुस्लीम राहत आहेत. मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन लोक येत आहेत. पोलीस तिथे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. ते ड्रग्ज विकतात, महिलांची छेड काढतात आणि आपण फक्त षंडासारखं पाहत राहायचं,” असा संताप राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चांचा अर्थच लागला नाही
“मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत,” असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला.

“पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएएबद्दल काहीच माहिती नाही. फक्त व्हॉट्सअॅपवर चर्चा करतात आणि मेसेज पुढे पाठवतात. हा १९५५ सालचा कायदा आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यानंतर १९५५ साली हा कायदा झाला. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज २००० मधील परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. पण आज काय परिस्थिती आहे त्या देशांची आणि खासकरुन पाकिस्तानची,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

राज ठाकरेंनी यावेळी घुसखोरांचं संकट गंभीर प्रश्न असल्याचं म्हटलं. “माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.