महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को संकुलात होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून या अधिवेशनात मनसेचा झेंडा नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे. तसंच या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुमारे वीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील. दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात नगरविकास, कृषी, ग्रामीण विकास आदी सात ठराव मांडण्यात येणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांनी उद्घाटन केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून दुपारी ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या स्वरूपातील झेंड्याचे अनावरण केले जाणार असून राज यांच्या भाषणाने समारोप होणार आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळी ‘मी महाराष्ट्राचा व महाराष्ट्र माझा’ असे सांगत राज यांनी मनसेच्या झेंडय़ाचे तीन रंग का आहेत हे स्पष्ट केले होते.

विकासाची भाषा करता करता मराठी पाट्यांचे आंदोलन, परप्रांतींयाविरोधातील आंदोलन तसेच अनधिकृत फेरीवाला, टोल आंदोलन २००६ पासून केली. तथापि गेल्या पाच वर्षांत राज्यात सर्वत्र मनसेची पडझड झाली. आता मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसेचा तिरंगी झेंडा बदलून मनसे भगवा झेंडा हाती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाअधिवेशनाच्या दिवशीच MSEB कडून वीजपुरवठा बंद?
आज होणाऱ्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान मनसेच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, याच कालावधीमध्ये एमएसईबीकडून भारनियमन केलं जाणार आहे. यासंदर्भातील मेसेजेसही राज्यातील विविध भागातील ग्राहकांना केला जात आहे. महत्वाचे काम असल्याने २३ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान विजपुरवठा बंद ठेवला जाईल असं या मेसेजेसमध्ये सांगण्यात आलं आहे.

मनसेचे म्हणणं काय?
मुद्दाम मनसेच्या अधिवेशनाच्या काळातच वीज पुरवठा खंडित करण्याचा हा डाव असल्याची टीका मनसेने केली आहे. “सरकारला असं काही करुन साध्य होणार नाही. हे खालच्या पातळीवर जाऊन केलेलं राजकारण आहे. ग्रामीण भागामध्ये असे संदेश अनेकांना गेले आहेत. त्यामुळेच असं केल्याने काहीच मिळणार नाहीय. तसेच एमएसईबीला यासंबंधी योग्य पद्धतीने जाब विचारला जाणार आहे,” असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे. देशपांडे यांनी या मेसेजेचा स्क्रीनशॉर्टही ट्विट केला आहे.

ट्विटर हँडलवरुन हटवला झेंडा
मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसत आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे.

कसा असेल नवा झेंडा?
पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.