शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

राज्य सरकारच्या कामावर नजर ठेवण्याचं काम शॅडो कॅबिनेटद्वारे करण्यात येणार आहे. मनसेची शॅडो कॅबिनेट राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. तसंच गैरव्यवहार होत असल्याचं त्याचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहे.

काय आहे शॅडो कॅबिनेट ?
सरकारमध्ये विरोधी पक्षाला मोठं महत्त्व असतं. विरोधी पक्षाद्वारे सरकारमधील प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला शॅडो कॅबिनेट असं म्हटलं जातं. या कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पाहता मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येकावर अधिक जबाबदारी असेल.

आणखी वाचा – अखेर मनसेचा झेंडा बदलला, राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

यापूर्वीही भारतात शॅडो कॅबिनेटचे प्रयोग करण्यात आले होते. २००५ मध्ये तत्कालिन सरकारला लक्ष्य करण्यासाठी शिवसेना आणि भाजपानं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसनं तत्कालिन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना लक्ष्य करण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. गोव्यातही शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करण्यात आला होता.