उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असे विधान करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवार केला आहे. संजय निरुपम हा भटका कुत्राच असून आधी त्याला मुंबईतून बाहेर काढले पाहिजे, असे विधान मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.
नागपूरमधील उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी एक विधान केले होते. उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूस करतो. त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल, असे त्यांनी म्हटले होते.
सोमवारी निरुपम यांच्या विधानाचा मनसेने समाचार घेतला. ठाण्यात मनसेने लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास सोमवारी पत्रकार परिषदेत चोपले. या पत्रकार परिषदेत ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संजय निरुपम यांच्यावरही टीका केली.
संजय निरुपम हा कुत्रा आहे. आधी त्याला महाराष्ट्रातून बाहेर काढले पाहिजे. ती घाण असून मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये भांडण लावायचं काम ते करतात. महाराष्ट्रातील लोकांनी आधी एकत्र येऊन निरुपमला ठेचले पाहिजे. याच्यामुळेच उत्तर भारतीय लोकं असे घाणेरडे कृत्य करतात, अशा लोकांना संजय निरुपमच पाठिशी घालतो, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, सोशल मीडियावर मनसेने संजय निरुपम यांच्याविरोधात पोस्टही व्हायरल केल्या आहेत. यात संजय निरुपम यांचे व्यंगचित्र असून ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 12:25 pm