भारताचे परराष्ट्र धोरण हे संरक्षण व गुप्तहेर खाते ठरवते. हेही माहीत नसणारे पंतप्रधान मोदी भेटवस्तू देऊन सतत परदेश दौरे करत फिरत आहेत. त्यांचे परराष्ट्र धोरण पूर्णत: अपयशी ठरले असून, मोदींनी चीनला जाऊन फारसे धाडस केलेले नाही. भारताचे अन्य देशांशी असलेले संबंध बिघडले असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी काहीतरी जादू करतील व देश सुजलाम् सुफलाम् होईल, अशी देशवासीयांना राहिलेली आशा पुरती अपयशी ठरली आहे. मोदींनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न झाल्याने त्यांची जादू पूर्णत: फसवी असल्याचे स्पष्ट झाल्याची टीका चव्हाण यांनी केली. महाराष्ट्रातील यवतमाळ येथील सभेत मोदींनी शेतमालाला हमीभाव व शेतकरी कर्जमाफी देतो, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन न पाळले गेल्याने शेतकरी व शेती उद्योग उद्ध्वस्त झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

सार्वत्रिक निवडणुकात मोदींना विरोधकांच्या मत विभाजनाचा फायदा झाला. त्यांनी बहुमताच्या जोरावर घोषणावर घोषणा केल्या. या घोषणा, आश्वासने व जाहीरनामा तपासल्यास जनतेला फसवण्याच्या हेतूने त्यांचा भपका व जाहिरातबाजी जोरात चालली असल्याचे दिसून येईल, अशीही टीका चव्हाण यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलने, संघर्ष यात्रा व संप झाले. त्यात मध्य प्रदेशप्रमाणे अनुचित घटना घडेल या भीतीने राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. पण, तिचे विश्लेषण द्यायला सरकार तयार नाही.

यामध्ये कुठेतरी पाणी मुरतेय, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कर्जमाफीच्या निर्णयात निश्चित गौडबंगाल असून, सरकार शेतकरी कर्जमाफीचे विश्लेषण द्यायला का तयार नाही? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी केला.

बडय़ा उद्योगपतींची मोठी कर्जे बुडवली जात आहेत. पण, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, हे या राज्याचे दुर्दैव असून, आपण मुख्यमंत्री असताना व्याजमाफीची योजना आणली. त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्ज भरत होते. पण, सध्याच्या कर्जमाफीमुळे कुणालाही समाधान मिळेल अशी परिस्थिती नाही. देशात काँग्रेस आघाडी सरकारने २००८ मध्ये ७२ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केली. त्या वेळी काँग्रेसने पोकळ आश्वासने दिली नव्हती, याकडे लक्ष वेधताना केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.