पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटनात्मक काम करायला आवडेल. आधी काम करीत होतो आणि पुढेही संघटनात्मक काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची कबुली पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सरचिटणीस संजय जोशी यांनी दिली.
गुजरातमध्ये कार्यरत असताना पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरलेले व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये ज्यांचे नाव घेतले जात होते असे ज्येष्ठ नेते संजय जोशी गेल्या पाच सहा वषार्ंत पक्षामध्ये फार सक्रिय नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होणार असल्याची चर्चेला ऊत आला होता. त्यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर भाजपच्या काही निवडक कार्यकत्यार्ंनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संजय जोशी म्हणाले, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवातीपासून काम करीत आहे. पक्षामध्ये माझे कोणाशीही मतभेद नाहीत. नरेंद्र मोदी आमचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडेल आणि करीत आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षात पुन्हा सक्रिय होणार का, असे विचारले असताना मी पक्षाच्या बाहेर कधीच नव्हतो.  कुठलेही पद मागितले नाही. कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
 नागपुरात राहून संघटन कौशल्य कोळून प्यालेल्या संजय जोशींनी देशव्यापी दौऱ्यांची सवय सोडलेली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोशी यांना विरोध असल्यामुळे त्यांनी कुठल्याही पदावर राहू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात होती. मात्र, रा.स्व. संघाचा वरदहस्त असलेल्या जोशी यांनी त्यानंतर काही काळ भाजपमध्ये काम केले.
 नितीन गडकरी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्यावर उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान कार्यकारिणीचे विशेष आमंत्रित असलेल्या जोशी यांनी राजीनामा दिला होता.