News Flash

अरेरे काळाने साधला डाव! ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज ठरली अपयशी

आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नुकताच डॉक्टर झालेल्या २५ वर्षीय राहुलला करोनामुळे जीव गमवावा लागला

डॉ. राहुल पवार

करोना संसर्ग आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गानंतर गेल्या महिन्याभरापासून लढणाऱ्या डॉ. राहुल पवारची झुंज अखेर संपली. बुधवारी उपचारादरम्यान राहुलचा औरंगाबादमधील एमजीम रुग्णालयात मृत्य झाला. हालाकीच्या परिस्थितीत देखील राहुलने डॉक्टर बनण्याचे स्वप्न  पूर्ण केलं होतं. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.

राहुल पवारने २६ एप्रिल रोजी आपल्या फेसबुकवर स्वत: चा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात त्याने ‘अंतिम वर्ष उत्तीर्ण झालो आता अधिकृतपणे डॉ राहुल आशा विश्वनाथ पवार’ असे लिहिले होते. त्याच्या या फोटोवर अनेक मित्र आणि हितचिंतकांनी त्याचे अभिनंदन केलं होतं. बुधवारी औरंगाबादमध्ये कोविड -१९ मुळे झालेल्या गुंतागुंतीमुळे राहुल पवार या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आता त्याचे मित्र त्याला श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त करत आहेत. ऊसतोड कामगाराच्या या कुटुंबातीह हा पहिला डॉक्टर मुलगा करोनाने त्यांच्यापासून हिरावून घेतला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील आनंदनगर या गावात राहणाऱ्या पवार कुटुंबामध्ये राहुल सर्वात धाकटा होता. शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. गाळप हंगामात राहुलचे आई वडिल आणि मोठा भाऊ स्थलांतर करुन ऊस तोडणीसाठी राज्यभर प्रवास करायचे.

राहुलच्या कुटुंबीय उसाच्या कापणीसाठी जात होते त्यामुळेच त्याला पैसे मिळायचे. अभ्यासात हुशार असलेल्या डॉ. राहुलला लातूरच्या महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेच्या (एमआयएमएसआर) पाच वर्षांच्या एमबीबीएस कोर्समध्ये प्रवेश मिळाला होता असे त्याच्या सोबत शिकणाऱ्या डॉ. अमरनाथ गुट्टे यांनी सांगितले.

घरच्यांकडून मिळणाऱ्या पैशातूनच राहुलने आपले शिक्षण पूर्ण केलं. राहुलला डॉक्टर करण्यासाठी त्याचा मोठा भाऊ सचिनने दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडले. राहुलचे सुरुवातीचे संपूर्ण शिक्षण सरकारी निवासी शाळेत झाले.

एप्रिलमध्ये त्याची अंतिम परीक्षा संपल्यानंतर लवकरच डॉक्टर होणारा राहुल आपल्या गावी गेला होता. त्यानंतर २६ एप्रिल रोजी करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि मेच्या सुरुवातीलाच त्यांना औरंगाबादच्या एमजीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलविण्यात आले. “मे पर्यंत आमच्या इंटर्नशिप सुरू झाल्या पण राहुल तेव्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा भाऊ त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी दररोज आम्हाला फोन करायचा. दरम्यान त्याची प्रकृती अधिकच खालावली होती असे, ” डॉक्टर गुट्टे म्हणाले.

तोपर्यंत, त्याच्या घराच्यांकडचे सर्व पैसे संपले होते तेव्हा त्यांच्या मित्रांनी एकत्र आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. २० मे रोजी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पैसा जमा करण्यासाठी मोहीम राबविली ज्यामुळे बऱ्याच जणांना मदत केली. यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांनीदेखील उपचारासाठी मदत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर पैसे जमवण्यापर्यंत रुग्णालयाने आधीच त्याच्या उपचाराचा पुढील खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला होता.

राहुलच्या कुटुंबियांनी राहुल लवकर बरा होईल अशी आशा असतानाच डॉक्ट गुट्टे आणि त्याच्या मित्रांना राहुलला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणार होते हे समजले होते. “व्हिडिओ कॉल्समधून १५ मे रोजी तो आमच्याशी अखेरचा बोलू शकला. त्यावेळी तो लवकरच इंटर्नशिप करायची आहे असे सांगत होता, ” डॉ. गुट्टे म्हणाले. करोनाव्यतिरिक्त राहुलला नंतर म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला होता. बुधवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

“राहुलची गोष्ट ही सर्व अडचणींवर मात करुन मिळवलेल्या यशाची गोष्ट आहे. तो आपल्या कुटुंबातील पहिला डॉक्टर होता आणि त्याचा मृत्यू अशा वेळी झाला जेव्हा तो नुकताच आपल्या आई-वडिलांच्या स्वप्न पूर्ण करणार होता. आमच्यासाठी, आम्ही आमचा मित्र गमावला आहे,”डॉ. गुट्टे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 10:24 am

Web Title: month after he became a doctor sugarcane harvester son dies of covid complications abn 97
Next Stories
1 प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का?; स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेस नेत्याचा सवाल
2 “उद्धव बेटा मी तुझी शिक्षिका बोलतीये; कृपया मदत कर,” ९० वर्षीय सुमन रणदिवेंची आर्त हाक
3 अबकी बार… मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच शतक!
Just Now!
X