जव्हारमध्ये माता-पित्याचे छत्र हरपलेल्या त्या दोघींचा टाहो

विजय राऊत, कासा

त्यांचे राहते घर, घरही म्हणण्यास जीभ कचरेल असे. म्हणजे इथले ग्रामस्थ त्यांच्या घराला गोठा म्हणतात. त्या घराच्या उंबऱ्यात आजी उभी होती. तिला ऐकू कमी येत होतं आणि तिला समोर कोण उभं आहे, हे दिसतंही नव्हतं. तिच्याभोवती दोन नाती केविलवाण्या नजरेनं उभ्या होत्या. पहिली तिसरीत शिकणारी आणि दुसरी पहिलीत शिकणारी. त्या परवा शाळेतून आल्या तेव्हा घराभोवती माणसांचा एका गराडा का, या प्रश्नाची उकल होत नव्हती. दबकत दबकत जेव्हा त्यांनी निश्चल पडलेल्या आई आणि भावाचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. दोघींच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केलेली होती. इथे आई गमावल्याचं दु:ख, तर आईनेच विष पाजलेली आठ महिन्यांची बहिण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याच्या घटनेने त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळलेला.

त्यांच्यावर दु:खाचा पहिला प्रसंग १२ जून रोजी कोसळलेला होता. १२ जून रोजी आजाराला कंटाळून पिता जीवल हांडवा यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली होती. नवऱ्याचा मृत्यू सहन न झालेल्या रुक्षणा हांडवा हिने विष पिऊन आयुष्य संपवले होते.

जीवलच्या आत्महत्येनंतर घरचा करता माणूस गेल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन नसल्याने रुक्षणा हिने टोकाचे पाऊल उचलेले होते.

जीवल वीटभट्टीवर काम करीत होता. परंतु अचानक रोजगार गेल्याने आई, पत्नी आणि चार मुलांच्या पोटाला काय घालायचे या विवंचनेत जीवल स्वत:चा  जीवनप्रवास संपवला.

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना.

रुक्षणा हिने आत्महत्येचे पाऊल उचलले त्या दिवशी सुमंत आणि जागृती दोघी शाळेत होत्या.

त्यामुळे त्या वाचल्या. परंतु डोक्यावरील माता-पित्याचे छतच हरवल्याने कोवळ्या वयातच विवंचनेचा भार घेऊन जीवन जगावे लागणार आहे.

सध्या गावातील काही लोक त्यांना अन्न आणून देत आहेत. त्यावर दोन वेळची भूक भागत आहे. परंतु शिक्षणाचे काय आणि खायचे काय, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.