पंढरपूर : तालुक्यातील कासेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली. मुलीला लग्नानंतर नांदवण्याच्या कारणावरून आणि जाचहाटामुळे मुलीच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या सासूचा खून केला आहे. सुनीता नारायण गुंड असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरम्य़ा घटनेत पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले आहेत.

तालुक्यातील कासेगाव येथील सुनीता गुंड यांचा मुलगा शहाजी याचा विवाह बळीराम गांडुळे यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी झाला. लग्नानंतर भाग्यश्री हिला सासू सारखा जाच करीत होती. याचा राग मनात धरून भाग्यश्री हिचे वडील आणि नातेवाईक यांनी १६ जानेवारी रोजी सुनीता गुंड याना पाईप व इतर हत्याराने मारहाण केली होती. यात सुनीता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सुनीता गुंड यांचे निधन झाले. या प्रकरणी शहाजी गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बळीराम गांडुळे,श्रीकांत गांडुळे,दत्तात्रय गांडुळे,लक्ष्मण गांडुळे, चिमाजी गांडुळे,हनमंत गांडुळे, नाना गुंड,समाधान गांडुळे आणि सोमनाथ गांडुळे यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.

तर दुसऱ्या घटनेत, पोलीस असल्याचे सांगून एका महिलेचे दागिने आणि ऐवज अज्ञात चोरटय़ाने लंपास केला. मंगळवेढा येथील वजीरा बागवान या पंढरपूर एस.टी.बसने पंढरपूर येथे आल्या होत्या. येथील सांगोला चौकात उतरल्यावर तीन अनोळखी व्यक्तीने पुढे पोलीस आहेत,तुमच्या अंगावरील सर्व सोने काढून तुमच्या पिशवीत ठेवा असे सांगितले. या महिलेच्या हातातील पाटली आणि बांगडी त्या चोरटय़ाने काढण्यास मदत केली. त्याच वेळेस बागवान यांची नजर चुकवून त्या चोरटय़ाने ती पिशवी लंपास केली. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.