News Flash

निसर्गाच्या शाळेनं खूप काही शिकवलं, ही नीतिमुल्ये जपत राहिन -राहीबाई पोपेरे

सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं गौरव

‘मला जो पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, तो मी आतापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा गौरव असून, बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहोचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वाची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही, परंतु निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले आणि निसर्गाची नीतिमूल्ये जपत यापुढेही कार्य करत राहीन. माझ्या आदिवासी समाज आणि तमाम अकोलेकरांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारते, अशा भावना बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.

बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण अकोले तालुक्यात आनंदाची लहर पसरली होती. पारंपरिक बियाणांच्या जतन संवर्धनाचे आणि विषमुक्त शेतीच्या प्रचाराचे, त्या करीत असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर झाला. दोन वर्षांंपूर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन बीबीसीने जगातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला होता. केंद्र शासनाचा नारी शक्ती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. कोंभाळणे या आपल्या गावी त्यांनी तयार केलेली बियाणे बँक कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय ठरली आहे. ज्येष्ठ शात्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता.

शाळेची पायरीही कधी न चढलेल्या राहीबाई कोंभाळणे या खेडेगावच्या. अकोले तालुक्यातील हे एक आदिवासी खेडेगाव. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या. सुमारे दशकभरापूर्वी ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे १७ पिकांचे ४८ प्रकारचे वाण होते. पुढे ‘बायफ’च्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत ५४ पिकांचे ११४ पेक्षा अधिक वाण आहेत.

कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी ,भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्य तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या सारखे गळीत धान्य. विविध प्रकारच्या भाजीपाला, रानभाज्या, असे विविध वाण त्यांचे बियाणे बँकेत आहेत. निरक्षर राहीबाई या बियाणांचा ज्ञानकोश असल्याची खात्री पटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 8:55 pm

Web Title: mother of seeds rahibai popere reaction on padma awards bmh 90
Next Stories
1 ‘हिवरेबाजार पॅटर्न’ जगातील काही देशात गेला; हा लोकांच्या कामाचा गौरव -पवार
2 आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर : ”मर्सिडीजमधून उतरणाऱ्यालाही मिळेल शिवभोजन थाळी”
3 राज ठाकरेंचं ‘ते’ कार्टून सोशल मीडियावर झालं व्हायरल
Just Now!
X