आई ही आपल्या बाळासाठी मरणाच्या टोकापर्यंत जाऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच जुन्नर येथे आला. जुन्नर येथे बिबट्याने अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला चढवला होता. आई दीपालीने दुर्गेचे रूप घेत बिबट्याला पिटाळून लावलं आणि बाळाला मृ्त्यूच्या दाढेतून सोडवलं. आई बाळाला मृत्यूच्या दारातून ओढत होती तर दुसरीकडून बिबट्या चिमुकल्याच्या तोंडाला धरून ओढत होता. यात घटनेत दीड वर्षाचा ज्ञानेश्वर हा जखमी झाला असून त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत.

सविस्तर माहिती अशी की, माळी दांपत्य हे ऊसतोड कामगार असून त्यांना दीड वर्षीय ज्ञानेश्वर नावाचा मुलगा आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर ते उन्हाळा असल्याने शेतात कोपीच्या बाहेर बाळासह झोपले होते. मध्यरात्री दीड वाजता अचानक बिबट्याने ज्ञानेश्वरवर हल्ला चढवला. तो रडत असल्याने दिलीप आणि आई दीपाली यांना जाग आली. समोर अत्यंत भीतीदायक दृश्य दिसत होते. आई दीपालीने बाळाचा पाय धरला व तो शेवटपर्यंत सोडला नाही. तर दुसरीकडे बिबट्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात वडील दिलीप यांनी बिबट्याचा तोंडावर हातात मिळेल ती वस्तू मारली. आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. बाळाला प्रथमोपचार घेण्यासाठी तातडीने ओतूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान,वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी आर्थिक मदतीचे आश्वासन दिल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. ज्ञानेश्वरवर बाल रोग तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता कदम आणि डॉ.विनायक पाटील हे उपचार करत आहेत.