खासदार बाळू धानोरकर यांची काँग्रेसच्या धरणे आंदोलनात भाषण करताना जीभ घसरली असून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय वाईट व खालच्या पातळीवर टीका केली. यामुळे अस्वस्थ झालेले माजी मंत्री हंसराज अहीर यांनी काँग्रेस खासदारांना घरातूनच ही शिकवण मिळाली आहे. त्यामुळेच ते पंतप्रधानांवर पातळी सोडून टीका करीत असल्याचे मत व्यक्त केले.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी शहर काँग्रेस समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाषण करताना खासदार बाळू धानोरकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याबद्दल अतिशय हीन पातळीवर टीका केली. दरम्यान, खासदारांच्या या भाषा प्रयोगाचा सर्वस्तरातून निषेध होत असतानाच गुरुवारी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या खासदाराने देशाच्या पंतप्रधानाबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे वाईट असल्याचे म्हटले आहे. खासदार धानोरकर यांच्या घरातील हीच संस्कृती असावी, त्यामुळे ते माझ्याबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल इतक्या वाईट शब्दात बोलले. हा निंदनीय प्रकार आहे. खासदारांचे वक्तव्य हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा पटले नसेल. एखाद्या असंस्कृत पक्षातून काँग्रेस पक्षात आलेला व्यक्ती कसा वागतो हे आता काँग्रेसला कळत असेल. खासदारांच्या भाषेबद्दल कायदेशीर कारवाईसाठी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. एखादी निवडणूक पराभूत होणे हा अपराध नाही, मात्र जिंकून आल्यानंतर माजणे योग्य नाही, असेही अहीर म्हणाले.

खासदार धानोरकर यांच्या घरातील हीच संस्कृती असावी. खासदारांचे वक्तव्य हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा पटले नसेल. एखाद्या असंस्कृत पक्षातून काँग्रेस पक्षात आलेला व्यक्ती कसा वागतो हे आता काँग्रेसला कळत असेल.

– हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री