सतत केवळ विरोध व तक्रारी करून अर्बन बँकेची बदनामी करणा-या विरोधी संचालकांनी बँकेच्या प्रगतीला खीळ घातली. तेच आता जनसेवा पॅनेलच्या माध्यमातून बँकेच्या मुळावर घाव घालत आहेत. ज्यांना साधा कर्जदारही बँकेकडे आणता आला नाही, त्यांना सभासद निवडणुकीत थारा देणार नाहीत, अशी टीका बँकेच्या निवडणुकीतील सत्ताधारी सहकार पॅनेलचे नेते खा. दिलीप गांधी यांनी केली.
निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पॅनेलचे नेते व उमेदवार सुवालाल गुंदेचा तसेच उमेदवार उपस्थित होते. बँकेचा व्यवसाय, नफा वाढवण्यासाठी तसेच देशपातळीवर जाण्यासाठी मल्टिस्टेट दर्जा आवश्यक असताना विरोधक ‘डबक्यातील बेडका’सारख्या मनोवृत्तीने वागत आहेत, असा आरोपही खा. गांधी यांनी केला.
जनसेवा पॅनेलचे नेते कायदेतज्ज्ञ, पंडित आहेत, तरीही ते मल्टिस्टेटचा दर्जा रद्द करण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र कायद्यात त्याची तरतूदच नाही, हे त्यांना माहीत नाही. दर्जा रद्द करायचा तर बँकच विसर्जित करावी लागेल याचा अर्थ ते बँकेच्या मुळावरच घाव घालत आहेत, असे गांधी म्हणाले. विरोधकांनी तक्रारी करताना सहकार खात्याकडे खोटय़ा सह्य़ांचे अर्ज दाखल केले, एकाही अर्जावर खरी सही नाही, सर्व तक्रारी झेरॉक्स कॉपींच्या सह्य़ांच्या आहेत, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.
यंदाचा १५ टक्के लाभांश व शताब्दी महोत्सव वर्षातील भेटही विरोधकांनी तक्रारी करून बँकेची बदनामी केल्यानेच प्रलंबित राहिल्याचा आरोप गांधी यांनी केला. त्यांच्या काळात, सन २००२ ते २००८ दरम्यान बँकेच्या ठेवी केवळ ३५० कोटी होत्या, आता त्या ९५० कोटीवर गेल्या आहेत. ज्या सारस्वत व कॉसमॉस बँकेच्या प्रगतीची उदाहरणे विरोधक देत आहेत, त्याच बँकांनी मल्टिस्टेटच्या आधारावर प्रगती केली याकडे ते दुर्लक्ष करतात, असेही गांधी म्हणाले.
सहकार पॅनेलची आश्वासने
– पाच वर्षांत ५ हजार कोटी रु.पेक्षा अधिक व्यवसाय करणार
– शाखांची संख्या २०० पर्यंत वाढवणार व देशभर नेणार
– बचत खातेदारांना अपघाती विमा संरक्षण देणार
– माजी सैनिकांच्या ठेवीवर १ टक्का अधिक व्याज
– कर्मचा-यांना प्रशिक्षण व घरकुल योजना